उर्वरीत कर्मचारीही दोन दिवसात हजर होणार
आजरा प्रतिनिधी
एस. टी. कर्मचाऱ्यांना 22 तारखेपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या दोन दिवसात आजरा आगारातील कर्मचारी मोठय़ा संख्येने हजर झाले आहेत. 160 चालक व वाहकांपैकी 122 कर्मचारी हजर झाले असून उर्वरीत कर्मचारी येत्या दोन दिवसात हजर होणार असल्याची माहिती आजरा आगारातून देण्यात आली.
एस. टी. महामंडळाच्या आजरा आगाराकडे असलेल्या 75 चालकांपैकी 58 तर 75 वाहकांपैकी 54 कर्मचारी हजर झाले आहेत. चालक व वाहक अशी दोन्ही कामे करू शकणारे 10 कर्मचारी हजर झाले असून उर्वरीत कर्मचाऱयांनीही मेडीलक तपासणीसाठीचे अर्ज नेले आहेत. कर्मचारी मोठय़ा संख्येने हजर झाल्यामुळे 80 टक्के बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. 22 तारखेपासून 100 टक्के फेऱया सुरू होतील असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात आजरा आगातील प्रशासकीय व कार्यशाळेतील कर्मचारी सहभागी झाले नव्हते. त्यामुळे प्रशासकीय 20 व कार्यशाळेतील 37 कर्मचाऱयांची हजेरी शंभर टक्के आहे. मोजकेच चालक व वाहक जानेवारी व फेब्रुवारीमध्ये हजर झाल्याने मोजक्या बस फेऱया सुरू करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून 80 टक्के बसफेऱया सुरू झाल्या आहेत. आजरा-बेळगांव व आजरा-कोल्हापूर मार्गावर दर तासाला आजरा आगातून बस धावत होती. तर गडहिंग्लज मार्गावर प्रत्येक अर्ध्या तासाला बस फेरी सोडली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
याशिवाय आजरा आगारातून धावणाऱया आजरा-पुणे, आजरा-वल्लभनगर, पंढरपूर या बसफेऱया तसेच ग्रामीण भागातील फेऱया, शेजारील भुदरगड तालुक्यातील कडगांव-पाटगांव वस्तीची फेरी आणि तालुक्यातील वस्तीच्या फेऱयाही सुरू करण्यात आल्या आहेत. बस फेऱ्या सुरू झाल्यानंतर हळूहळू प्रवाशांचाही प्रतिसात मिळू लागला असून लवकरच आजरा आगाराची एस. टी पूर्ववत सुरू होईल अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.