प्रतिनिधी /बेळगाव
समर्थनम दिव्यांग संस्थेच्यावतीने अंध, मूकबधीर आणि दिव्यांगांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता उद्योग मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. 25 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत अळवण गल्ली, शहापूर येथील दिव्यांग संस्थेच्या कार्यालयात हा मेळावा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महांतेश किडसण्णावर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अंध, दिव्यांग मूकबधीर व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी रोजगार मेळावा भरविला जाणार आहे. एसएसएलसी, पीयुसी, आयटीआय, डिप्लोमा, बीई यासह पदवी, पदव्युत्तर व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
या मेळाव्यात 18 ते 35 वयोगटातील अंध, दिव्यांग व्यक्ती सहभागी होवू शकतात. शिवाय 25 हून अधिक कंपन्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे. यावेळी अरुणकुमार एम. जी., गिरीश सव्वाशेरी, कृष्णा लमाणी आदी उपस्थित होते.









