विट्यात परिवार संवाद यात्रेचे जंगी स्वागत
विटा प्रतिनिधी
कुठलीही संघटना विचारांवर अधारीत असेल, तर कार्यकर्ते झपाटून काम करतात. सध्या प्रचाराचं तंत्र बदललेले आहे. तुम्ही लोकांशी संपर्क ठेवल्याशिवाय लोक तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत. त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे. त्यामुळे बुथ कमिट्या सक्षम करा, असे आवाहन पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुजित गव्हाणे, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूण लाड, माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, ज्येष्ठ नेते विनायक पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, प्रतिक जयंतराव पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विटा पालिकेच्या कामाचा गौरव
यावेळी विटा नगरपालिकेचा स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी आमदार सदाशिव पाटील यांनी राज्याने याची दखल घेतली नसल्याकडे लक्ष वेधले. त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी वैभव पाटील आणि माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांना मुंबईला या, असे निमंत्रण देत मुख्यमंत्र्यांच्याहस्ते तुमचा सत्कार करतो, असे सांगितले. विट्याने स्वच्छतेत केलेले काम खरोखर कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मंत्री जयंत पाटील यांनी काढले.
माजी आमदार सदाशिव पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्याचे नेतृत्त्व मोठे करायचे असेल तर सर्व कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने आपल्या विचारांची असली पाहिजेत. अद्याप आटपाडी तालुक्यात समाधानकारक काम नाही. विसापूर सर्कलमध्ये विसंवाद आहे. खानापूर तालुक्यात आम्ही चांगले काम करत असल्याकडे माजी आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार करणार असे आम्ही म्हंटले की काही जणांना बरे वाटत नाही. तुमचे महाविकास आघाडी म्हणून वर काही ठरले असेल तर आम्हालाही खाली सांगा. अद्याप तालुक्यात कमिट्या नेमल्या नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपण ताकद दिली पाहिजे, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, मतदारसंघातील काही गावे पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यातील अतिरीक्त ऊसाचा प्रश्न आहे. त्यामध्ये पाकलमंत्र्यांनी लक्ष घालावे. अशी विनंती केली.
यावेळी मेहबुब शेख, सक्षणा सलगर, रविकांत वरपे, सुजित गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन बागल, भारत पाटील, आनंदराव पाटील, राजू जानकर, सुशांत देवकर, किसन जानकर, अविनाश चोथे, हणमंत देशमुख, जयमाला देशमुख, सचिन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत अविनाश चोथे यांनी केले आभार सचिन शिंदे यांनी मानले.