ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीत दिग्दर्शक प्रफुल्ल कार (Prafulla Kar) यांचे रविवारी (17 एप्रिल) रात्री निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रफुल्ल कार हे ओडिया संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव होते. ते उत्तम लेखकही होते. कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”प्रफुल्ल कार यांच्या निधनाने दु:ख झाले. ओडिया संस्कृती आणि संगीतातील त्यांच्या अग्रगण्य योगदानासाठी त्यांचे स्मरण केले जाईल. त्यांना बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभले आणि त्यांची सर्जनशीलता त्यांच्या कामातून दिसून आली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती!”