ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ रविवारपासून आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून दोन्ही देशांमधील आर्थिक तसेच धोरणात्मक क्षेत्रात, विशेषत: सागरी सुरक्षामध्ये दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण मानली जाते.
पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ रविवारी त्यांचे मुंबईत आगमन झाले, मुंबईमध्ये भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीची घोषणा करताना परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की, जुगनाथ नवी दिल्लीतील त्यांच्या व्यस्तते व्यतिरिक्त गुजरात आणि वाराणसीला जाणार आहेत. 17 ते 24 एप्रिल या कालावधीत जुगनाथ यांच्यासोबत त्यांची पत्नी कोबिता जुगनाथ आणि एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल.
“भारत आणि मॉरिशस यांच्यात सामायिक इतिहास, संस्कृती आणि वारसा यांनी बांधलेले अनोखे घनिष्ठ संबंध आहेत. आगामी भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच जुगनाथ 19 एप्रिल रोजी जामनगरमधील WHO-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या भूमीपूजन समारंभ आणि 20 एप्रिल रोजी गांधीनगर येथे होणाऱ्या ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इनोव्हेशन समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सहभागी होणार आहेत.