लता मंगेशकर यांनी गायिलेला संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. असे सुस्वर आजकाल खूप दुर्मीळ झाले आहेत. पूर्वी सकाळच्यावेळी सात्विक अशी भक्तिमय अभंग आणि भजने रेडिओवर ऐकण्यास मिळत असत. कळत नकळत मनावर सात्विक विचारांचा प्रभाव पडत असे. चिंतनही होत असे. पण जसे जसे कलियुग पुढे जात आहे तसे हे सात्विक वातावरण नष्ट होऊन राजसिक आणि तामसिक वातावरण लोकांना आवडू लागले आहे. कर्णकर्कश आणि कोणताही भाव नसलेले, अर्थ नसलेले, चार शब्द कसे तरी जुळविलेले संगीत सकाळच्या वेळीच सुरू होते. अशा गोंगाटाने जर दिवसाची सुरुवात होत असेल तर उरलेला दिवस तरी कसा शांत आणि समाधानपूर्वक जगता येणार? संगीताने मनाला शांती प्राप्त होते आणि ते संगीत जर भगवंताशी जोडलेले असेल तर मनाला आत्मिक समाधानही प्राप्त होते. पण याचा विचारही करण्यास आपल्याकडे वेळ नाही हे दुर्दैव.
संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे ज्यामध्ये ते आपल्या विठ्ठलाच्या भेटीविषयी तळमळ व्यक्त करतात आणि हा विरहभाव तितक्मयाच भक्तिपूर्ण आवाजात लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकताना मनामध्ये नकळत का होईना पण एकप्रकारचा आध्यात्मिक आनंद अनुभवास येतो. त्या अभंगातील एक एक शब्द आपल्याला आकर्षित करतात आणि भगवंताशी आपली जवळीक निर्माण करतात. महाराज म्हणतात, भेटीलागे जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट
तुझी ।।1।। पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहे ।।2।। दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ।।3।। भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परी माउलीची ।।4।। तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवुनी श्रीमुख दावीं देवा ।।5।। अर्थात ‘हे भगवंता! पांडुरंगा! आपल्या भेटीची तळमळ लागली आहे म्हणून रात्रंदिवस मी तुझी वाट पहात आहे. पौर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन असल्यामुळे तो जसा चंद्रोदयाची वाट पाहतो, त्याप्रमाणे पांडुरंगा, माझे मन तुमची वाट पहात आहे. दिवाळीकरिता माहेरचे बोलावणे येईल अशी वाट पाहणारी मुलगी जशी उत्कंठित असते त्याप्रमाणे मी तुमच्या बोलावण्याची वाट पहात आहे. भुकेलेले तान्हे बाळ दुग्धपानासाठी व्याकुळ होऊन रडते आणि आईला शोधते त्याप्रमाणे मी तुमची वाट पहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘आम्हाला तुमच्या दर्शनाची तळमळ लागली आहे, हे जाणून माझ्यासाठी विनाविलंब धावून या आणि मला आपले मनमोहक सुंदर रूप पाहू द्या.’
या अभंगात तुकाराम महाराजांनी भगवद्भक्तीमधील शुद्ध भक्तांचा अत्युच्य भाव प्रकट केला आहे. श्रीकृष्णभावनाभावित शुद्ध भक्त हा सर्व स्वार्थीभावना म्हणजे शारीरिक भावनेच्या पलीकडे जाऊन परम सत्य अथवा अंतिम सत्याचा विचार करतो. आपण आपल्या जीवनात काहीही करतो त्यावर आपले संपूर्ण नियंत्रण असू शकत नाही हे कोणत्याही माणसाला थोडीशी जरी विवेकबुद्धी असेल तर मान्य करावेच लागेल. अगदी नास्तिक व्यक्तीलादेखील मान्य करावे लागेल की आपण सर्व कार्याचे नियंत्रक नाही. गीता भागवत आणि तत्सम वेदिक ग्रंथानुसार, प्रामुख्याने ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन येते ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्दविग्रहः अनादिरादिर्गोविन्दः सर्वकारणकारणम् अर्थात ‘सर्व कारणाचे कारण स्वतः सत्चित्तानंद भगवान श्रीकृष्ण आहेत, ते सर्वाना नियंत्रित करतात.’ त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्येही स्वतः श्रीकृष्ण सांगतात, (भ गी 9.10) मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् । हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते । अर्थात ‘हे कौंतेय! माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो.’ श्रीमद भागवतमध्येही याचप्रमाणे सांगितले आहे. (भा 2.9.33) अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम् । पश्चादहं यदेतच्च यो।़वशिष्येत सो।़स्म्यहम् । अर्थात ‘हे ब्रह्मा! सृष्टीरचनेपूर्वी केवळ मीच, पुरुषोत्तम भगवान अस्तित्वात होतो, त्यावेळी माझ्याशिवाय काहीच अस्तित्वात नव्हते, तसेच सृष्टीचे जे कारण ती भौतिक प्रकृतीही त्यावेळी अस्तित्वात नव्हती, आता तू ज्याला पहात आहेस तोसुद्धा मीच, पुरुषोत्तम भगवान आहे आणि प्रलयानंतरही जे शेष राहते तोसुद्धा मीच, पुरुषोत्तम भगवान असेन. (भा2.9.36) एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः । अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा । अर्थात ‘परम सत्य भगवंताचा शोध घेणाऱया जिज्ञासू व्यक्तीने निश्चितच सर्व परिस्थितीत सर्व काळ व अवकाश (सर्वत्र) आणि अप्रत्यक्ष व प्रत्यक्षपणेही येथपर्यंत शोध घेतलाच पाहिजे’ हे सर्व प्रामाणिक हरिभक्तिपरायण भक्ताकडून समजून घेणे महत्त्वाचे आहे.
काही लोक म्हणतात, भगवंत तर सर्वत्र आहेत, सर्वव्यापी आहेत, मग त्याला एका व्यक्तीपुरता मर्यादित करण्याची गरज काय? तात्विकदृष्टय़ा विचार केला तर हे म्हणणे बरोबर आहे, पण त्यासाठी सर्वत्र असणारे भगवंत व्यक्ती आहेत, त्यांचे रूप आहे, शरीर आहे, राहण्याचे स्थान आहे हे आपल्याला माहीत असेल तर त्यांना आपण सर्वत्र पाहू शकतो.
भागवतमध्येही वर्णन येते (भा 9.4.68) साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहम् । मदन्यत् ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि । अर्थात ‘शुद्ध भक्त सदैव माझ्या हृदयात राहतात आणि मी सदैव शुद्ध भक्तांच्या हृदयात राहतो. माझे भक्त माझ्याशिवाय कोणाला जाणत नाहीत आणि मी त्यांच्याशिवाय कोणाला जाणत नाही’ असे हे प्रेमाचे आदानप्रदान भगवंत आणि त्यांचे भक्त नित्य अनुभवत असतात. भगवंताच्या सान्निध्यामध्येच आपण राहत असू तर भगवंताचा विरह का वाटतो? काही जणांना तर हा विरोधाभास वाटतो. त्यासाठी हे आपण समजून घेतले पाहिजे की भगवद्भक्तीमध्ये युक्त असलेल्या व्यक्तीला भगवान श्रीकृष्णाची कितीही प्रेममयी सेवा केली तरी ती कमीच वाटते. ज्याप्रमाणे धनलोभी माणसाला कितीही धन मिळविले तरी समाधान होत नाही, त्याप्रमाणे हरिभक्ताला श्रीकृष्णाची कितीही प्रेमाने सेवा केली तरी त्याचे समाधान होत नाही. आणखी सेवा करण्यासाठी त्याची तळमळ होते, याच तळमळीतून त्याला विरह जाणवू लागतो आणि परिणामतः भगवत्प्रेम आणखी वृद्धिंगत होत जाते. हेच या अभंगातून व्यक्त होत आहे.
-वृंदावनदास








