युक्रेनचा रशियावर आरोप, शस्त्रांची युरोपियन देशांकडे मागणी
रशियाने युक्रेनच्या विविध भागांवर हल्ला करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. पूर्व युक्रेनमध्ये एका शरथार्थी शिबिरावरील क्षेपणास्त्र हल्ल्यात 7 नागरीकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला असून तो हेतुपुरस्सर केल्याचा आरोप रशियावर केला आहे. रशियाने मात्र शुक्रवारी सकाळी युक्रेनच्या एका सेनाचौकीला लक्ष्य बनविल्याचा दावा केला होता. या परस्परविरोधी दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे.
युक्रेनने शरणागती न पत्करल्यास क्षेपणास्त्र हल्ले आणखी तीव्र केले जातील असा इशाराही रशियाने दिला. युक्रेनच्या सैनिकांनी ब्रियान्स्क येथे हिंसाचार केल्याचा आरोपही रशियाने केला. या भागात युक्रेनच्या सैनिकांनी निवासी इमारती पाडवून नागरीकांना बेघर केल्याचे रशियाचे म्हणणे आहे. मात्र, त्याचा युक्रेनच्या प्रशासनाने इन्कार करताना रशियावर उलट आरोप केले आहेत.
पोलाद कारखान्यावर हल्ले
युक्रेनचे एकमेव बंदर असणाऱया मारुपोल येथील एका मोठय़ा पोलाद कारखान्यावर कबजा केल्याचा दावा रशियन सैन्याने केला. या कारखान्याला आम्ही युक्रेनच्या वर्चस्वापासून मुक्त केले आहे, अशी वृत्ते रशियन प्रसार माध्यमांध्ये येत आहेत. रशिया सध्या युक्रेनच्या पूर्व भागावर लक्ष केंद्रीत करत असून तेथील आर्थिक केंद्रे ताब्यात घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. युक्रेनची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा रशियाचा प्रयत्न असून इमारतींना लक्ष बनविले जात आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांची सरसकट पायमल्ली चालविली असून वेळीच त्याला रोखावे, असा इशारा युक्रेनने विश्व समुदायाला दिला आहे.
रशियाला दणका
रशियाच्या एका युद्धनौकेला गुरुवारी जलसमाधी देण्यात आली होती. हा रशियाला या युद्धात बसलेला सर्वात मोठा दणका मानला जातो. युक्रेनच्या युद्धनौकांनी त्यांच्यापेक्षा मोठय़ा या रशियाच्या युद्धनौकेवर चौफेर हल्ला चढवून बुडविले. नौका बुडण्याआधीच तिच्यावरील सर्व रशियन सैनिक बाहेर पडले होते. यामुळे युद्धनौकेच्या जलसमाधीमुळे जिवीत हानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
शस्त्रांची मागणी
रशियाला प्रतिकार करण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देशांनी युक्रेनला आणखी शस्त्रे पुरवावीत अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली आहे. रशिया प्रतिदिन जवळपास 100 क्षेपणास्त्र हल्ले करीत आहे. युक्रेनकडे ब्रिटन आणि फ्रान्सने पुरविलेली क्षेपणास्त्रे आणि विमानविरोधी अस्त्रे आहेत. तशाच प्रकारची आणखी शस्त्रे पाठवावीत, असे आवाहन युक्रेनच्या अधिकाऱयांनीही केले.
देशवासियांचा अभिमान
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याला आता 50 दिवस झाले आहेत. गेल्या 50 दिवसांमध्ये अपरिमित हानी सोसूनही आम्ही रशियाला शरण गेलेलो नाही. तसेच रशियान सैन्याचा प्रतिकार तिखटपणाने चालविला आहे. युक्रेनचा बराचसा भाग आजही युक्रेनच्याच ताब्यात आहे. रशियाने युक्रेन युद्ध 5 दिवसांमध्ये संपविण्याची उद्दाम भाषा केली होती. मात्र आज 50 दिवस झाले तरी रशियाला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट युक्रेनच्या सैन्यदलांनी रशियाची मोठी हानी केलेली आहे, याचा प्रत्येक युक्रेनवासियाला अभिमान वाटला पाहिजे. रशियासमोर आम्ही कधीही शरणागती पत्करणार नाही, असे उद्गार युक्रेन अध्यक्ष झेलेन्स्की यांनी काढले आहेत. ते शुक्रवारी देशाला उद्देशून भाषण करीत होते.









