लहान मुले आपल्या नादात असतात. त्यांना इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थकारण आदी डोकेखाऊ विषयांशी काहीही देणेघेणे नसते. त्यामुळे ती सुखी असतात. पण याला काही सन्माननीय अपवाद असतात. असाच एक अभिमानास्पद अपवाद आहे 11 वर्षे वयाचा बालइतिहासकार यशवर्धन. त्याचा नावलौकिक आत्ताच सातासमुद्रापार पोहचला आहे. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाने त्याला ‘बालइतिहासकार’ म्हणून सन्मानित करुन पुरस्कारही प्रदान केला आहे.
एवढेच नव्हे, तर गेल्या वर्षी 26 मार्चला नासाने आपले यान चंद्रावर पाठविले होते. त्या यानात यशवर्धनचे नावही समाविष्ट होते. त्यामुळे जगाच्या सीमा पार करुन त्यांच्या पलिकडे पोहचलेला तो कदाचित पहिला इतिहासकार असू शकेल. 11 व्या वर्षी त्याने इतिहास हा प्रमुख विषय घेऊन भारतीय विदेश सेवेची (आयएसफएस) परीक्षा दिली. ती तो उत्तीर्णही झाला आणि सर्वात लहान वयाचा आयएफएस बनला. कानपूरच्या या ‘चमत्कारा’ने आतापासूनच भारताचे नाव जगात उंचावण्याचे अभियान प्रारंभ केले आहे. तो अजून शाळेत आहे. शाळेचा अभ्यास सांभाळून त्याने मिळविलेले हे यश अद्वितीयच म्हणावे लागेल. त्याची ध्येयासक्तीही त्याच्या प्रतिभेइतकीच उत्तुंग आहे. भारताला ‘विश्वगुरु’ बनविण्याची त्याची महत्वाकांक्षा असून त्यासाठीच भारतीय विदेश सेवेत भवितव्य घडविण्याची त्याला आस आहे. इतिहास हा विषयही त्याने यासाठीच निवडला आहे.









