ऑनलाईन टीम / मुंबई :
मिरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील इतर भागात 100 हून अधिक कोटींचा टॉयलेट घोटाळा (toilet scam) झाला आहे. यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांचा सहभाग आहे. लवकरच सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, मिरा भाईंदर महापालिका आणि राज्यात इतर ठिकाणी युवा प्रतिष्ठान एनजीओद्वारे शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा झाला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून हा घोटाळा करण्यात आला आहे. या घोटाळ्यात किरीट सोमय्या यांचा सहभाग आहे. त्याची सर्व कागदपत्र मी सरकारकडे सुपूर्द केली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शरद पवार यांच्यावर ट्विट बॉम्ब डागले होते. त्यांची राष्ट्रभक्ती आता उफाळून आली आहे. त्यांनी टॉयलेट घोटाळ्यावरही बोलावं. भाजपने आमच्यावर कितीही बिनबुडाचे आरोप केले तरी आम्ही मागे हटणार नाही. विक्रांत सेव्ह मोहिमेसंदर्भात सत्र न्यायालयाने तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे द्या. सत्र न्यायालयाने तुमच्यावर बेईमानीचा ठपका ठेवला आहे. राजभवनानं सांगितलं की पैसे जमा झाले नाहीत. तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका, असेही राऊत म्हणाले.








