प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचा समावेश स्मार्ट सिटीत झाला असून हे शहर प्रगतिपथावर आहे. या शहराचा अन्य राज्यांशी वाहतूक आणि व्यापार यादृष्टीने संपर्क असून येथे इंटिग्रेटेड कुरिअर्स ऍण्ड लॉजीस्टिक (आयसीएल) सेवा सुरू झाल्याने ग्राहकांची उत्तम सोय होणार आहे, असे मत बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी व्यक्त केले.
आयसीएलच्या बेळगाव कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. टिळकवाडी येथील सराफ कॉलनीमध्ये कंपनीचे कार्यालय सुरू झाले आहे. ग्राहकांना वेळेत त्यांचे पॅकेजीस आणि पार्सल पोहोचणे ही आज काळाची गरज आहे. त्यादृष्टीने आयसीएल उत्तम सेवा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी नागतिलक गणिकोप्प यांनी सर्वांचे स्वागत केले. आयसीएलने आयएक्सजीसह भागीदारी केली असून आयएक्सजीचे विद्याधर पाटील यांनी बेळगावच्या जनतेला या सुविधेचा लाभ होईल. आज बहुतेक देशांमध्ये आमच्या माध्यमातून लोणची, मसाले, भांडी व अन्य उत्पादने पाठविली जात असून किफायतशीर व वेळेवर सेवा हे आपले वैशिष्टय़ असल्याचे त्यांनी सांगितले.
आयसीएलचे सीईओ जी. व्ही. रमणा यांनी युरोपियन देशांमध्ये आपण सेवा देत असून बेळगावकरांनीसुद्धा या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी कंपनीचे मुंबई प्रतिनिधी वैभव वाळवेकर यांच्यासह अनेक निमंत्रित उपस्थित होते.