पाच दिवस पोलीस स्थानकावर हजेरी लावण्याची अट
प्रतिनिधी / पणजी
खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केलेल्या सांखळी पालिकेचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांना न्यायालयाने 24 तासाच्या आत जामीन मंजूर केला आहे.
फरिदाबाद हरियाणा येथील व्यावसायिक अंकित जजोदिया यांनी जानेवारी महिन्यात आगशी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. सदर प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडे सोपविण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी सदर संशयित आरोपी धर्मेश सगलानी याला अटक केली होती.
सदर संशयित आरोपी पोलिसांना कोठडीत का हवा असा प्रश्न न्यायालयाने केला होता. सदर संशयितावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. खंडणी वसूल केल्याचा आरोप नसल्याने पैसे जप्त करण्याचा प्रश्न उदभवत नाही, अशी बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली होती.
याप्रकरणी इतर संशयित आरोपी असलेले बाऊन्सरना अटक करायची आहे. त्यांचा ठावठिकाणा हवा असल्यास सदर संशयित कोठडीत ठेवून दबाव आणणे गरजेचे आहे, त्यासाठी जामीन दिला जाऊ नये. 50 लाख रुपयांची खंडणी मागणे आणि जिवंत मारण्याची धमकी देणे हा गंभीर गुन्हा असून अशा गुह्यात जामीन दिला जाऊ नये, अशी बाजू सरकारी अभियोक्तांनी मांडली होती.
पाच दिवस पोलीस स्थानकावर हजर राहणे, साक्षीदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.









