हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / पणजी
इस्लामी राष्ट्र असलेल्या साऊदी अरेबियातसुद्धा अजानसाठी लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी आहे. परंतु भारतात मात्र सर्व मशिदींवर लाऊडस्पीकर बसवून मोठय़ा आवाजाने वाजवून ध्वनी प्रदूषण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. या प्रकाराविरोधात कोणतीही सरकारी यंत्रणा कारवाई का करत नाही?, असा सवाल हिंदू जनजागृती समितीने उपस्थित केला असून त्यासंदर्भात काल मंगळवारी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
अजानसाठी लाऊडस्पीकर वापरणे आवश्यक आहे, असे इस्लामी धर्मग्रंथ कुराणातसुद्धा कुठेही लिहिलेले नाही. कारण लाऊडस्पीकरचा शोध हा 19 व्या शतकात लागला होता. त्यामुळे कुराणमध्ये लाऊडस्पीकरचा उल्लेख येणे शक्यच नाही. त्याशिवाय 2021 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश देऊन मशिदींवर बेकायदेशीर लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी घातली होती. हा सर्व इतिहास असतानाही सर्व मशिदींवर लाऊडस्पीकर वाजवून रोज कैक वेळा अजान सादर करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
सुखाची झोप मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार
ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम 2000, नुसार रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत मोठय़ा आवाजात लाऊडस्पीकर वाजवता येत नाही. तरीही त्या कायद्याचे सर्रास उल्लंघनच होत असल्याचे निवेदनातून जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. सुखाची झोप मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. परंतु अजानच्या आवाजामुळे लहान बालके, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती यांची झोपमोड होत आहे. तरीही सरकारी अधिकारी आणि खास करून ज्यांना या प्रकाराविरोधात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, ते पोलिसही कोणतीही कारवाई करत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकाराविरोधात सरकाने कोणतीही कारवाई न केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येणार असून प्रत्येक मंदिरावर असेच लाऊडस्पीकर बसविण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. खरोखरच तसे करण्याची वेळ आल्यास सरकारसमोर मोठी समस्या निर्माण होईल, असेही त्यात म्हटले आहे.
2011 च्या जनगणनेनुसार गोव्यात मुस्लीमांची लोकसंख्या केवळ 8.33 टक्के एवढीच आहे. तरीही त्यांच्या लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे उर्वरित 91.67 टक्के जनतेच्या सुखाची झोप घेण्याच्या हक्कांवर गदा येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी त्वरित कारवाई करताना सर्व मशिदींवरील लाऊडस्पीकर हटविण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांनाही सादर करण्यात आली आहे.









