पुती गावकर यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
खाण पट्टा भागातील कुडणे येथील ज्या युवकाने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे त्याला जबाबदार भाजपा सरकार आहे. असा आरोप आपचे नेते पुती गावकर यांनी केला आहे. आत्महत्या केलेला युवक हा मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातीलच आहे. मुख्यमंत्री जर आपल्याच मतदार संघातील लोकांना सांभाळू शकत नसतील तर गोवा काय संभाळतील असा प्रश्न गावकर यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी पुती गावकर यांनी केली आहे.
काल सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुती गावकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आपचे नेते वाल्मीकी नाईक, राजदीप नाईक व अन्य उपस्थित होते. राज्यातील खाणी बंद होऊन आज जवळ जवळ चार वर्षे संपली खाण व्यवसायावर सुमारे तीन लाख लोक अवलंबुन आहे ते कसे दिवस काढतात त्यानाच माहित. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणे ही पहिलीच खेप असून ही सुरुवात आहे. बेरोजगारी लोकांना असहाय्य झाली आहे. खाणी सुरु करा म्हणून आम्ही मागणी करीत आहोत, मात्र सरकार कानाडोळा करीत आहे. हा प्रकार असाच सुरु राहिल्यास महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गोव्यातही बेरोजगारीला कंटाळलेल्या युवकांची आत्महत्तेची मालीका सुरु होईल असेही पुती गावकर म्हणाले.
खाण व्यवसाय अवलंबीताना दर महिना 25 हजार द्या
2015 ते 2020 या काळात राज्यात 96 आत्महत्या झाल्या आहेत त्यातील 45 हुन अधिक आत्महत्या या बेकारीमुळे झाल्याचे गावकर म्हणाले. कुडणे येथील ज्या युवकाने आत्महत्या केली त्यात त्यांनी बेकारीमुळे आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे बेकारीमुळेच ही आत्महत्या आहे हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील खाणी त्वरीत सुरु करा अन्यथा खाणी सुरु होईपर्यंत खाण पटय़ातील प्रत्येक कुटुंबाला दर महिना 25 हजार रुपये द्यावे अशी मागणी गावकर यांनी केली आहे.
भाजपा भ्रष्टाचारी सरकार
व्यवस्थित सरकार चालविण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत लायक नसल्याच आरोपही गावकर यांनी केला आहे. भाजप नेते केवळ आपली तीजोरी भरण्या पलीकडे दुसरा कोणताच विचार करीत नाही. भाजपा सरकार हे भ्रष्टाचारी सरकार असून प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करून आपली तिजोरी भरणे हेच त्यांचे काम आहे. सर्वसामान्य जनतेचे त्याना काहीच पडलेले नाही. केवळ निवडणूकीपूरते मतदारांना खोटी आमीशे दाखवून लोकांची फसवणूक करीत असतात. निवडणूका झाल्या की पुन्हः तोच प्रकार. निवडणूका होऊनही सरकार स्थापन करण्यासाठी आणि नंतर खाती वाटप करण्यासाठी जो वेळ लागला त्याचे कारणही तसेच आहे. कोणत्या खात्यात कीती लुबाडायला मिळेल याचा विचार करण्यातच दिवस गेल्याने खाती वाटप करण्यास वेळ लागल्याचा आरोपही गावकर यांनी केला आहे.
देशीत ज्या ठिकाणी भाजप सरकार आहे त्या राज्यात बेकारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. सरकार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीच उपाय योजना करीत नसल्याचे वाल्मीकी नाईक यांनी सांगितले. दिल्लीतील आप सरकारने जो अर्थसंकल्प संमत केला आहेत त्याचे नावच मुळात रोजगार अर्थसंकल्प आहे. पुढील वर्षात 20 लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. ही केवळ वाऱयावरची गोष्ट नसून त्याचे नियोजनही केलेले आहे असेही वाल्मीकी नाईक यांनी सांगितले. केवळ आप सरकारच जनतेचे हित पाहत असून भाजप केवळ स्वहितजपत असल्याचा आरोप वाल्मीकी नाईक यांनी केला आहे.
ज्या सुवकाने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याच्या मागे असलेल्यांची परिस्थिती बिकट आहे. सरकारने त्याला त्वरीत आर्थिक सहाय्य करून त्याच्या कुटुंबाची जबाबदारी स्विकारावी अशी मागणी पुती गावकर यांनी केली आहे. आमच्या संघटनेमार्फात त्या कुंटुंबाला 50 हजार रुपये दिले जातील असेही गावकर म्हणाले.









