इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानात आज इम्रान खान सरकारला बहुमत आहे की नाही, याचा निर्णय तेथील संसदेत होणार आहे. गेल्या गुरुवारी तेथील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना दणका देताना त्यांनी केलेली संसद विसर्जनाची सूचना घटनाबाहय़ ठरविली होती. तसेच संसदेची पुनर्स्थापना करुन शनिवारी बहुमत परीक्षण केले जावे असा आदेशही दिला होता. त्यानुसार आज इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करावे लागेल.
सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार इम्रान सरकार अल्पमतात आहे. या सरकारच्या सर्व मित्रपक्षांनी पाठिंबा काढला आहे. तसेच इम्रान खान यांच्या तेहरीक ए इन्साफ या पक्षाच्या अनेक सदस्यांनीही विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे हीच स्थिती कायम राहिल्यास, तसेच आज शनिवारचे बहुमत परिक्षण सुरळीत पार पडल्यास इम्रान खान यांच्यावर सत्ता सोडण्याची नामुष्की ओढविणार हे निश्चित मानले जात आहे. या सरकारविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. तो संसदेच्या उपाध्यक्षांनी मतदानाआधीच फेटाळला होता. त्यानंतरच या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती.
गोंधळ होण्याची शक्यता
शक्तीपरीक्षणाच्यावेळी सत्ताधारी सदस्यांकडून सभागृहात गदारोळ केला जाण्याची शक्यता आहे. गोंधळात अविश्वास प्रस्तावावरील चर्चा होऊ शकणार नाही आणि त्यामुळे सरकार वाचविता येईल, असा विश्वास काही सत्ताधारी सदस्यांनी व्यक्त केला. तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी इम्रान खान यांची गच्छंती आता कोणीही टाळू शकणार नाही असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.









