दिवंगत सीए अरुण गुप्ता यांची कन्या आकृती यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे. 2015 मध्ये अरुण गुप्ता यांना रक्तक्षय (ब्लडकॅन्सर) च्या आजाराने गाठले. तथापि, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक मानसिकता यामुळे त्यांनी या दुर्धर व्याधीलाही पराभूत केले. तथापि, त्यांच्या कुटुंबाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 2020 मध्ये कोरोनाच्या उदेकात त्यांची जीवनज्योत मालवली. कुटुंबासाठी हा मोठाच धक्का होता. तथापि, त्यांची कन्या आकृती हिने पित्याची स्मृती एका प्रेरणादायी मार्गाने जिवंत ठेवण्याचा निर्धार केला.

या निर्धारातूनच ‘विन ओव्हर कॅन्सर’ या संस्थेचे काम पाहण्यास आकृतीने प्रारंभ केला. ही संस्था सीए अरुण गुप्ता यांनीच कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून ते कॅन्सरपिडितांना धीर देणे आणि त्यांचा जगण्यासंबंधीचा निर्धार वाढविणे ही महत्त्वाची कामे करीत असत. तसेच गरीब कॅन्सररुग्णांना मोफत औषधोपचारही या संस्थेच्यावतीने शक्मय तितक्मया प्रमाणात केले जात असत. ही संस्था हीच अरुण गुप्ता यांची जितीजागती निशाणी होती. आता या संस्थेचा कार्यभार आकृतीने सांभाळला असून आपल्या पित्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने ती वाटचाल करीत आहे. गेल्या दोन वर्षात या संस्थेचा मोठा विस्तार झाला असून यासाठी आकृतीला 2020 चा युएन व्हॉलिंटियर पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्तनांचा कॅन्सर झालेल्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना योग्य तो सल्ला देणे तसेच गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी साहाय्य करणे इत्यादी कामे ही संस्था आता आकृती यांच्या नेतृत्वात करीत आहे. आकृती यांच्या कार्याची आणि पितृप्रेमाची प्रशंसा पंचक्रोशीत होत आहे.









