सानुमती अप्सरा दोन दासींचा संवाद अदृश्यरूपात राहून ऐकत असते. दासींची नावेही कालिदासाने किती गोड ठेवल्येत पहा! एक आहे मधुकरिका आणि दुसरी परभ्रुतिका! वसंतागमनाने दोघी खूपच उल्हसित झाल्या आहेत. परभ्रुतिका वसंतगान गात असते स्वतःशीच. तांबूस, हिरवट रूपातल्या आम्रमंजी-या झाडावर दिसत आहेत. मधुमासाचा प्राणच जणू तो सर्वांना प्रसन्न करीत आहे! तिचे हे पुटपुटणे ऐकून त्याबद्दल मधुकरिका तिला विचारते. तेव्हा त्यांच्यात वसंतऋतुचा आरंभ झाला म्हणजे विलासगीते गायला हवीत, आंब्याचा मोहर वाहून कामदेवाची पूजा करायला हवी अशी चर्चा रंगते. मधुकरिका मोहोर तोडण्यासाठी परभ्रुतिकेची मदत घेते. मोहराच्या मादक सुगंधाने दोघीही भारावून जातात. हात जोडून मोहोर कामदेवाला वाहतात. तेवढय़ात कंचुकी पडदा सारून तिथे येतो आणि दोघींना ओरडू लागतो. महाराजांनी वसंतोत्सवाला बंदी केली असल्याचे सांगतो. पण त्यांना राजाची आज्ञा माहित नसल्याचे सांगतात. तेव्हा कंचुकी म्हणतो, ‘वासंतिक तरूंनी आणि पक्ष्यांनीदेखील मानलेली राजाची आज्ञा तुम्हांला कळली नाही?’ ते पटवण्यासाठी तो उदाहरणे देतो. आंब्यांवर मोहोर आला, तरी त्यांच्या कळय़ा फुलल्या नाहीत. कोरांटीला कळे आले, पण ते अजूनही फुलले नाहीत. कोकिळानेही हेमंत ऋतू संपला, तरी गायन सुरू केले नाही. कंचुकीचे बोलणे ऐकून सानुमतीला हा राजर्षि महाप्रतापी आहे हे पटते. दोघी दासीही कंचुकीला तिकडे येण्याचे कारण सांगतात. राज्यशालक मित्रावसूंनी त्या दोघींना राजाच्या सेवेतून प्रमदवनाची राखण करायला थोडय़ाच दिवसांपूर्वी पाठवलेले असते. त्यामुळे तिथली त्यांना फारशी माहिती नसते.
म्हणूनच राजाज्ञाही त्यांना कळलेली नसते. पण तरी अशी आज्ञा त्यांनी का केली असावी असे त्या कंचुकीला विचारतात. तेव्हा तो सांगतो की, शकुंतलेला राजाने टाकल्याचा प्रवाद तरी त्यांच्या कानावर आला असेल. तेव्हा अंगठी सापडल्यापर्यंतची हकिगत त्यांच्या कानावर आल्याचे त्या सांगतात. तेव्हा कंचुकी पुढचा खुलासा करतो की, ती अंगठी पाहिल्याबरोबर आपण गुप्त रितीने शकुंतलेशी विवाह केल्याचे राजाला आठवले. स्मृतीभ्रंशामुळे आपण तिला टाकली हे त्याला आठवले. महाराजांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्यामुळे त्याची अगदी वाईट अवस्था झाली आहे. राजाला सृष्टीसौंदर्याचाही वीट आलाय, तो आता सचिवांना सल्ल्यासाठी भेटत नाही, अंतःपुरातल्या लोकांशीही तो औपचारिक बोलतो, हाक मारताना त्यांची नावेही त्याला आठवत नाहीत.








