साबांखामंत्री नीलेश काब्राल यांचे संकेत : दक्षता खात्याच्या अहवालानंतर अंतिम निर्णय
प्रतिनिधी / पणजी
सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरतीमधील वादग्रस्त ठरलेली 300 पदे दक्षता खात्याच्या चौकशीत सापडल्याने ती रद्द करण्याचे संकेत खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिले आहेत. ती पदे रद्द करून नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला आहे. दक्षता खात्याचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये खात्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ती चालू असताना तत्कालीन आमदार बाबूश मोन्सेरात यांनी त्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप उघडपणे केला होता. तसेच तत्कालीन मंत्री दीपक पाऊसकर यांच्यावर निशाणा साधला होता. आपण केलेल्या उमेदवारांची शिफारस विचारातच घेतली नसल्याचे मोन्सेरात यांनी उघडपणे बोलून दाखवले होते. हे प्रकरण काही दिवस गाजत राहिल्याने शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून त्या भरतीला स्थगिती दिली होती. ते प्रकरण दक्षता खात्याकडे सोपवले होते.
निवडणुकीमुळे निर्णय राहिला प्रलंबित
या प्रकरणाचा चौकशी अहवाल अद्याप आलेला नाही. दरम्यान त्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या काही उमेदवारांनी गुणवत्तेनुसार नोकरी मिळाल्याचा दावा करून आल्तिनो पणजी येथील डॉ. सावंत यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला होता आणि भरती रद्द न करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणूक आल्याने हा विषय तसाच प्रलंबित राहिला आणि त्यावर कोणताही अंतिम निर्णय झाला नाही.
आता मंत्री काब्राल यांनी हा विषय पुन्हा काढला असून संबंधित निवड झालेले उमेदवार काय निर्णय होतो याकडे लक्ष ठेवून आहेत.









