बाला रफीक शेख, पृथ्वीराज पाटील, कौतुक डाफळे, संग्राम पाटील यांचे नेत्रदीपक विजय
फिरोज मुलाणी / सातारा :
महाराष्ट्र केसरीच्या आखाडय़ात खुल्या गटातील सलामीच्या लढतीत गोंदीयाच्या वेताळ उर्फ दादा शेळकेने उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याच्यावर 4 विरूद्ध 3 गुणांनी मात करून धक्कादायक निकालाची नोंद केली. याच गटात महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, सिकंदर शेख यांनी नेत्रदीपक विजय मिळवून तिसऱया फेरीत वाटचाल केली. गादी गटात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, सातारचा दिग्वीजय जाधव, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, कौतुक डाफळे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली.
बाला रफीक, महेंद्र गायकवाड एकतर्फी
सोलापूरच्या तुफानी ताकदीच्या महेंद्र गायकवाडने रत्नागिरीच्या संतोष दोरवडला चितपट करीत आखाडय़ात खळबळ उडवून दिली. मुंबई शहरचा विशाल बनकर आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील कुस्ती शेवटपर्यंत रंगली. दुसऱया फेरीत बनकरने एकेरी पटाचे पकड करीत गुणाचा फलक हलता ठेवून मोहोळचे तगडे आव्हान परतून लावले. महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखने लातूरच्या भारत कराडला सुरूवातीपासून वरचढ ठरून दिले नाही. एकेरी पट आणि दुहेरी पट यासारख्या अस्त्रांचा वापर करून तांत्रिक गुणांवर भारतला पराभूत केले.
माऊलीचा अनुभव पहिल्या फेरीतच पणाला
वाशिमच्या सिकंदर शेखपुढे हिंगोलीच्या दिगंबर भुतनरची डाळ शिजली नाही. एकेरी पटाची पकड करून ताबा मिळवलेल्या सिकंदरने भारंदाज डावावर त्याला चितपट केले. अमरावतीच्या माऊली जमदाडे आणि कोल्हापूर शुभम शिदनाळे याच्यात काटय़ाची टक्कर झाली. पहिल्या फेरीत पिछाडीवर असताना देखील माऊलीने अनुभव पणाला लावून दुसऱया फेरीत निर्णायक गुण मिळवून प्रतिष्ठेची लढत खिशात टाकली. मुंबई शहरच्या भारत मदने याने नाशिकच्या नारायण मारकट वर तांत्रिक गुणाधिक्क्याने विजय मिळवला.
आदर्श गुंडला पराभवाचा धक्का
गादी गटात सुरूवातीलाच महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता आदर्श गुंड यांच्या लढतीत आदर्शने केलेले सर्व हल्ले धुडकावून लावत सदगीरने ही प्रतिष्ठेची लढत एकतर्फी जिंकली. पहिल्या फेरीत पिछाडीवर असताना आदर्शने दुसऱया फेरीत केलेला प्रतिकार हर्षवर्धनच्या आक्रमणापुढे फिका पडला. स्पर्धेतील ही प्रतिष्ठेची लढत हर्षवर्धनने 8 विरूद्ध 2 गुणांनी जिंकून स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले. पहिल्या फेरीतील विजयानंतर वाशिमचे प्रतिनिधीत्व करणारा नैनेश निकमला दुसऱया फेरीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने पराभवाची धूळ चारली. कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सुरूवातीपासूनच आपली आगेकूच कायम ठेवली आहे. गणेश जगताप हिंगोली, संग्राम पाटील कोल्हापूर यांनी आपल्या प्रतिस्पर्धीवर विजय मिळवत महाराष्ट्र केसरी गटातील आपले आव्हान कायम ठेवले. माती गटातील सातारचे आव्हान संपुष्टात आले असताना गादी गटात दिग्वीजय जाधवने दुसऱया फेरीत अमरावतीच्या अब्दुल सय्यदवर मात करून तिसऱया फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्याच्या सातारकरांच्या आशा आता दिग्वीजयवरच उरल्या आहेत.
वेताळच्या बचावापुढे किरणची कुंडी निष्प्रभ
आज किरण भगत विरूद्ध वेताळ शेळके ही लढत अतिशय चुरशीची झाली. थोडासा दबाव घेऊन खेळणारा किरण शेवटपर्यंत खुललाच नाही. त्याच्या भात्यातील कुंडी डावाचे शस्त्र वेताळच्या भक्कम बचावापुढे निष्प्रभ ठरले. सुरूवातीच्या फेरीत पिछाडीवर असून वेताळने आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव पणाला लावून तुफानी ताकदीचा किरण भगतला सातारच्याच आखाडय़ात पराभवाचा धक्का देत सगळय़ांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.