देव म्हणजे काय? माणसापेक्षा श्रे÷ आणि पवित्र असलेली एक शक्ती जी त्याला जगण्याची उमेद देते. जगात प्रत्येक संस्कृतीसाठी देव वेगळा आहे. कोणासाठी तो एका मूर्तीमधे बसतो, तर कोणासाठी निसर्गामध्ये. पण विशेषतः भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून शिकवले गेले आहे की देव हा प्रत्येक माणसामध्ये असतो. म्हणूनच आपण ‘अतिथी देवो भव’ असा संस्कृत सुविचार ऐकत आलो आहोत. भारतीय संस्कृतीमधे असंख्य देवी-देवतांची पूजा केली जाते. पण आजकाल आपण त्या शक्तीला वंदन करायचे सोडून धर्मामध्ये मानवी नियम आणि रीतिरिवाजात जास्त अडकत चाललो आहोत. आपल्या पूर्वजांनी पुराणात लिहून ठेवलेल्या देव आणि देवींबद्दल पुन्हा एकदा जाणून घेणे गरजेचे आहे.
भारतातील हिंदू समाजामध्ये अनेक देवदेवता आहेत आणि प्रत्येक देव पृथ्वीवरील आयुष्यातील एका ठरावीक क्षेत्राचे निर्माते आणि संरक्षक म्हणून पूजिले जातात. उदाहरणार्थ, सरस्वती, ही ज्ञानाची देवी आहे. त्याचबरोबर विष्णू देवांचे दशावतार, मत्स्य (मासा), कुर्म (कासव), वराह (डुक्कर), नरसिंह (मनुष्य-सिंह), वामन (बटू), परशुराम (योद्धा), बलराम (गुराखी), बुद्ध (शिक्षक) आणि कल्की यांचा उल्लेख हिंदू पुराणात केला गेला आहे.
हे सर्व दशावतार प्रत्येक युगामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि समाजाला संकटापासून वाचवण्यासाठी पूजिले जातात. याचाच अर्थ काय तर एका माशापासून ते गुराख्यापर्यंत, प्रत्येक जीव हे देवाचेच एक रूप आहे आणि म्हणूनच आपण प्रत्येक जीवाची आपुलकीने काळजी केली पाहिजे.
पण आज, अशाच एका देवरुपी मनुष्यावर निर्दयी अन्याय होताना पहायला मिळतो आहे. मागच्या आठवडय़ात राजस्थानमधील एका स्त्रीरोगतज्ञाने आत्महत्या करून स्वतःला संपवले. का? तर निसर्गाच्या नियमांपुढे तिची वैद्यकीय शक्ती कमी पडली. तिच्याकडे एक गर्भवती आली होती. जिला भरपूर अंतर्गत समस्या आधीपासूनच होत्या. त्यामुळे 2 तास प्रयत्नांची शर्थ करूनदेखील डॉ. अर्चना शर्मा त्या महिलेला वाचवू शकली नाही. त्या महिलेच्या पतीने एका व्हीडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यानंतर त्या मृत महिलेच्या परिवारासाठी त्यांनी सहानुभूतीपूर्वक मोफत रुग्णवाहिकेची सोयदेखील करून दिली आणि त्या महिलेच्या काही नातेवाईकांनी मागचा पुढचा विचार न करता, त्या महिलेचा मृतदेह रुग्णालयासमोर आणून ठेवला आणि डॉ. अर्चनावर खुनाचा गुन्हा दाखल करायला लावला. या आरोपाचा डॉ. अर्चनाच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्यांच्याकडे जीव संपवण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. याच डॉ. अर्चनाने कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा केली होती.
अपार मेहनत करून, शिक्षण घेऊन, लोकांच्या सेवेसाठी सज्ज असलेले हे डॉक्टर्स आता लोकांना खुनी वाटू लागले आहेत. जो तो आज गूगलवर वाचून, चुकीची माहिती गोळा करून अनुभवी डॉक्टरांवर ठपका ठेवत आहे. वैद्यकीय क्षेत्र हा खूप पूर्वीपासून एक ईश्वरी व्यवसाय मानला गेला आहे. पण आज त्याच डॉक्टरांना माणूस म्हणूनदेखील सन्मान मिळत नाही. कित्येकदा चित्रपटांमध्ये रक्तपात पाहिला की आपल्या अंगावर शहारा येतो. पण हेच डॉक्टर्स दररोज किंबहुना दिवसरात्र अशा त्रासदायक परिस्थितीला सामोरे जातात. तारुण्यात जेव्हा मुले-मुली आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर आयुष्याचा आस्वाद घेत असतात त्यावेळेला हेच वैद्यकीय क्षेत्रात शिकणारे विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करून, रुग्णालयात प्रशिक्षण घेऊन रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी सज्ज होत असतात. मानवी शरीराची रचना आणि त्यावर औषधांचा आणि शस्त्रक्रियेचा परिणाम समजून घेऊन आपला जीव वाचवणे, हे एक महान कौशल्य आहे, नाही का?
आपण कोणत्याही वैद्याकडे किंवा डॉक्टरांकडे तेव्हाच जातो जेव्हा आपण आजारी असतो. त्यांना आपल्या त्रासाचा अंदाज आला की त्यावर ते योग्य ते औषध आपल्याला देतात. त्याव्यतिरिक्त आपला त्या डॉक्टरांबरोबर फारसा वैयक्तिक संबंध येत नाही.
अशावेळेला आपण हे विसरतो की टेबलच्या पलीकडे बसलेल्या पांढरा कोट घातलेल्या त्या डॉक्टरांमध्येसुद्धा एक सामान्य माणूस दडला आहे. आपल्याला एका व्यक्तीच्या वेदना बघून जेवढा त्रास होईल, तेवढाच त्रास त्या डॉक्टरांनादेखील होतो. पण सगळेच मन कमकुवत करून बसले तर जीव कोण वाचवणार? म्हणून नाईलाजाने त्यांना मन कठोर करावे लागते.
गेल्या 2 वर्षात कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव धोक्मयात घालून लोकांची सेवा केली, त्यांना वाचवले म्हणून आज आपण निश्चिंत राहू शकतो. एवढे असूनसुद्धा मागचा पुढचा विचार न करता डॉक्टरांना मारहाण होते, नको नको ते आरोप केले जातात आणि डॉ. अर्चना शर्मासारख्या बऱयाच निर्दोष डॉक्टरांचा जीवदेखील जातो. डॉ. अर्चना शर्माला त्या बाईची हत्या करून काय मिळणार होते? निसर्गाच्या नियमांपुढे आजपर्यंत कोणाचे काही चालू शकले आहे का? हे समजून घेण्यापेक्षा एका निर्दोष डॉक्टरांवर एवढा मोठा आरोप केला गेला.
आपल्याला कंटाळा आला, बरं वाटत नसेलतर आपल्याला सुट्टी टाकता येते. पण वैद्यकीय क्षेत्र कधीच बंद पडत नाही. महामारीच्या काळात डॉक्टरपण रुग्णालये बंद करून घरी बसले असते तर? रात्री अपरात्री तब्येत खराब झाल्यावर रुग्णालय बंद असले तर? तेव्हा गूगलची मदत घेऊन जीव वाचवता येईल का?
ईश्वरी व्यवसायात असलेल्या या सर्व डॉक्टरांवर होणारे प्राणघातक हल्ले आणि अत्याचार बंद झाला पाहिजे. जे लोक निर्दयीपणे रुग्णालयात शिरून तोडफोड करतात, निर्दोष डॉक्टरांवर हात उचलतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक जीवाला मान मिळालाच पाहिजे, पण त्याआधी आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना मान द्यायला सुरुवात केली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रासारख्या थोर क्षेत्राचा आदर केला पाहिजे. या क्षेत्राला योग्य तो सन्मान मिळायला हवा. ‘उडदामाजी काळे गोरे काय ते निवडावे’ अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे प्रत्येक व्यवसायामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात. अगदी मूठभर वाईट लोकांमुळे पूर्ण वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करणे अतिशय चुकीचे आहे. शेवटी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक माणसाच्या ज्ञानाचा, कष्टाचा आणि त्यागाचा मान आपण समाज म्हणून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
-श्राव्या माधव कुलकर्णी








