सरकार बँकर्ससह फायनान्शिअल सल्लागारांच्या संपर्कात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी विमा क्षेत्रातील सरकारी कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) या कंपनीचा लवकरच आयपीओ बाजारात दाखल होणार असल्याचे संकेत आहेत, अशी माहिती एका अहवालामधून समोर आली आहे.
सरकार रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (आरएचपी) वर बँकर्स आणि फायनान्शिअल सल्लागार यांच्या संपर्कात आहे. यामध्ये आरएचपी ऑफर डाक्युमेंट असतो, त्याच्या आधारे कंपनी आयपीओ आणण्याच्या अगोदर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याकडे फाईल करते. याचे सादरीकरण हे ड्राफ्ट हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) नंतर केले जाते.
आरएचपीमध्ये प्राईस ब्रँड आणि समभागांची संख्या यांची माहिती दिली जाते. सरकारची मार्च 2022 पर्यंत आयपीओ आणण्याची योजना होती. परंतु रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धजन्य स्थितीमुळे बाजारात नकारात्मक कल राहिला. अशा स्थितीत सरकारने प्रतिक्षा करणे योग्य मानले. सध्या बाजारात सुधारणात्मक वातावरण निर्माण झाल्याने सरकार पुन्हा एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्याची तयारी करत आहे.
एलआयसीने 13 फेब्रुवारीला आयपीओसाठी पहिला ड्राफ्ट सादर केला होता. सेबीने ड्राफ्ट पेपर्सला मंजुरी दिली होती. ज्यामुळे समभाग विक्रीचा रस्ता मोकळा झाला. परंतु आयपीओ सादर करण्यास मात्र उशिर झाला आहे.
इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ
सरकार एलआयसीमधील 5 टक्के समभाग विक्री करुन 60,000 कोटी रुपये जमा करण्याची शक्यता आहे. 5 टक्के हिस्सेदारी विक्री करण्यात आल्यानंतर सदरचा आयपीओ हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.









