शोकसभेत शंकरराव पाटील यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली
बेळगाव : शंकरराव पाटील यांच्या निधनाने बेळगावातल्या एका दानशूर व्यक्तीचा अंत झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ हरपले आहे, असे विचार अनेक मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले.
मराठा कॉलनी येथील रहिवासी, मार्केट यार्डमधील अडत व्यापारी आणि मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक शंकरराव गंगाराम पाटील यांचे गेल्या शुक्रवार दि. 1 एप्रिल रोजी वयाच्या 87 व्या वषी निधन झाले. त्यानिमित्त विविध संस्था व संघटनांच्यावतीने मराठा मंदिर येथे रविवारी सायंकाळी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विविध संस्थांच्यावतीने शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी शंकरराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करीत समाज भवनासाठी त्यांनी पहिली अडीच लाखांची देणगी दिली. सीमाप्रश्नांसह अनेक उपक्रमांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले, असे ते म्हणाले. सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने अध्यक्ष नेताजी जाधव यांनी, मंदिरे बांधण्यापेक्षा शाळा, वाचनालये बांधा, असे शंकरराव पाटील सांगत असत. त्यांच्या जाण्याने समाज एका उत्तम मार्गदर्शकास मुकला आहे, असे सांगितले.
मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी शंकररावांना मराठा संस्थांच्याबद्दल कशी आस्था होती, समाजासाठी काय केले पाहिजे, यावर ते नेहमी मार्गदर्शन करीत, असे विचार व्यक्त
केले.
जलाराम फाऊंडेशनच्यावतीने कनुभाई ठक्कर, मराठा मंडळाच्यावतीने उपाध्यक्ष नागेशराव झंगरुचे, अडत व्यापारी विनोद होनगेकर, मराठा वधू-वर सूचक मंडळाच्यावतीने ईश्वर लगाडे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीतर्फे शुभम शेळके, दक्षिण म. शिक्षण मंडळाच्यावतीने एम. बी. निर्मळकर, साहित्य संघाच्यावतीने परशराम मोटराचे, दै. ‘रणझुंझार’च्यावतीने मनोहर कालकुंद्रीकर, अंनिसच्यावतीने शंकरराव चौगुले, उद्योजक महादेव चौगुले, नातेवाईक दीपक किल्लेकर, रोहन गुरव, दुकानातील कामगार कल्लाप्पा पाटील याबरोबरच अनेक उपस्थितांनी शंकरराव पाटील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी राजेंद्र मुतगेकर, शिवाजी कागणीकर, अनंत लाड, शिवाजी हंगिरगेकर, नागेश तरळे, रघुनाथ बांडगी, मार्केट यार्डमधील व्यापारी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले.









