प्रतिनिधी/ सातारा
संजीवनी सामाजिक संस्थेमधून चार टक्के व्याजदराने कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष 3 महिलांनी पाच जणांना दाखविले. त्यांची 6 लाख 7 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोमल सनी भिसे, अनिता पाटील उर्फ राणी किशोर गालफाडे यांना अटक करण्यात आली असून स्वाती सुरजकुमार कांबळे फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चारुशीला शिवाजीराव मोहिते(रा. सत्वशील नगर, औद्योगिक वसाहत परिसर, शिवप्रभा बंगला, सातारा) या महिलेचा गारमेंटचा व्यवसाय आहे. त्यांना चार टक्के व्याजाने कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगितले. जुन 2021 ते 1 एप्रिल 2022 दरम्यान कोमल सनी भिसे(रा. गणेश प्लाझा फेज 2, देगाव रोड, सातारा), अनिता पाटील उर्फ राणी किशोर गालफाडे, स्वाती सुरजकुमार साळुंखे या तिघींनी चारुशीला मोहिते यांची 2 लाख 82 हजार फसवणूक केली. यांच्यासह साधना संजय जाधव यांची 97 हजार 400 रुपये, योगेश वामनराव भोसले यांची 90 हजार 400 रुपये, श्रीधर पाटणकर यांची 1 लाख 20 हजार रुपये, उज्वला दत्तात्रय काटकर यांची 17 हजार 700 रुपये अशी एकूण 6 लाख 7 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कोमल सनी भिसे, अनिता पाटील उर्फ राणी किशोर गालफाडे अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे असून स्वाती सुरजकुमार कांबळे फरार आहे.
फसवणूक झाली असेल तर गुन्हा दाखल करा…
कोमल भिसे, राणी गालफाडे, स्वाती साळुंखे यांनी सातारा शहर परिसरासह फलटण, वडुज या तालुक्यातील लोकांना कमी व्याज दरात पैसे देतो म्हणून गंडा घालण्याची शक्यता आहे. तरी अशी फसवणूक झाली असेल तर गुन्हा दाखल करण्याचे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.









