ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
भारतीय समुद्री हद्दीत घुसलेली पाकिस्तानी बोट गुजरातच्या भुजमधील हरामी नाला भागात बीएसएफ जवानांनी जप्त केली आहे. समुद्री सीमेवर स्तंभ क्रमांक 1160 जवळ भारतीय सीमेत जवळपास 100 मीटर आतमध्ये रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही नाव पकडण्यात आल्याची माहिती बीएसएफनं दिली आहे.
रविवारी बीएसएफ जवानांकडून नियमित पेट्रोलिंग केलं जात होतं. यावेळी एक अज्ञात बोट जवानांच्या निदर्शनास आली. या बोटीबाबत संशय आल्यानं बीएसएफ जवानांनी या बोटीच्या दिशेनं मोर्चा वळवला. ती मासेमारीची पाकिस्तानी बोट होती. या बोटीमध्ये मासे साठवण्याचं सामानही आढळून आलं आहे. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
फेब्रुवारीत बीएसएफने 18 पाकिस्तानी बोटवर या ठिकाणी कारवाई केली होती. त्यामुळे ही बोट घातपाताच्या हेतूने आली होती, की वाट चुकून आली होती, याचा तपास सुरू आहे.









