बेळगावच्या उपनोंदणी कार्यालयात प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर तालुक्मयातील जमीन बेकायदेशीररित्या बेळगाव उपनोंदणी कार्यालयात खरेदी-विक्रीची नोंद करून त्यानंतर सात-बारा उताऱयावर नावे दाखल करणाऱया खानापूरच्या तत्कालीन तहसीलदारांसह बेळगाव उपनोंदणी अधिकारी, खानापूर नोंदणी कार्यालयातील एसडीए आणि जागा विक्री करणाऱया आणि घेणाऱयांसह साक्ष म्हणून मदत करणाऱया तब्बल 16 जणांवर मार्केट पोलीस स्थानकामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.
खानापूर तालुक्मयातील आमटे येथील लक्ष्मण मल्लाप्पा नाईक आणि बळवंत बुद्दाप्पा नाईक यांची 20 एकर 20 गुंठे जमीन महेश कृष्णा होनगेकर याने जीपीद्वारे घेतली. त्यानंतर तीच जमीन लक्ष्मण आणि बळवंत यांनी नारायण गंगाराम लाड यांना नोंदणीकृत जीपीद्वारे दिली.
त्यानंतर पुन्हा महेश होनगेकर याने लक्ष्मण मल्लाप्पा नाईक आणि बळवंत बुद्दाप्पा नाईक यांच्याकडून बेळगाव येथील उपनोंदणी कार्यालयामध्ये जमीन खरेदी केली. वास्तविक, या जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार खानापूर येथील नोंदणी कार्यालयामध्ये होणे गरजेचे होते. मात्र बेळगाव येथील नोंदणी कार्यालयात त्याची नोंद झाली होती. त्यावर कहर म्हणजे खानापूरच्या तत्कालीन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना बेकायदेशीर खरेदी असल्याची माहिती असताना त्यांनी सात-बारा उताऱयावर महेश होनगेकर यांचे नाव दाखल केले.
या सर्व प्रकारामुळे रितसर नोंदणीकृत जीपी केलेल्या नारायण गंगाराम लाड यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांनी पैसे दिले असतानादेखील त्यांच्यावरच दमदाटी करण्याचा प्रकारही घडला होता. त्यांनी फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. यामुळे त्यांनी सर्व कागदपत्रे जमवून या जमिनीसंदर्भात झालेला गैरप्रकार वकिलांना सांगितला. त्यानंतर ऍड. श्रीधर मुतकेकर, ऍड. आशिष कट्टी, ऍड. जुनेद इनामदार, ऍड. रवी मगदूम यांनी येथील जेएनएफसी द्वितीय न्यायालयामध्ये खासगी फिर्याद दाखल करण्याबाबत अर्ज केला.
त्या अर्जावर वकिलांनी युक्तिवाद केला असता न्यायालयाने या प्रकरणातील 16 आरोपींविरोधात मार्केट पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मार्केट पोलिसांनी मूळ जमीन मालक लक्ष्मण मल्लाप्पा नाईक (वय 77, रा. हब्बनहट्टी, ता. खानापूर), बळवंत बुद्दाप्पा नाईक (वय 61, रा. हब्बनहट्टी, ता. खानापूर), मुख्य संशयित महेश कृष्णा होनगेकर (वय 42, रा. गणेशबाग, बेळगाव), साक्ष म्हणून मदत करणारे नागेश मेत्री, राजभाऊ मादार, आनंद डी. पाटील, संतोष काळे, उपनोंदणी अधिकारी, खानापूर उपनोंदणी कार्यालयातील एसडीए दीपक देसाई, तत्कालीन खानापूर तहसीलदार रेश्मा तालिकोटी, सदाशिव शेखर बेन्नाळी, मारुती कृष्णा हुरकडली, रामलिंग नारायण कर्लेकर, किरण नारायण पाटील, पुरुषोत्तम आणि रघुनाथ रत्नाप्पा साळुंखे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खानापूर येथील या जमिनी व्यवहारामुळे गैरप्रकार उघडकीस आला आहे. या सर्वांवर कलम 114, 117, 119, 166, 167, 181, 143, 406, 417, 420, 423, 465, 468, 120/बी सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









