अनगोळ येथील घटनेने खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
पुढे 2-3 खून झाले आहेत. तुमचे दागिने सांभाळा, असा सल्ला देत दोघा भामटय़ांनी एका वृद्धेच्या अंगावरील तीन तोळय़ाचे दागिने पळविले आहेत. शुक्रवारी सायंकाळी अनगोळ येथील बँक ऑफ इंडियाजवळ ही घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कमल श्रीरंग गजगेश्वर (वय 70, रा. मेनरोड, अनगोळ) या शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे हरिमंदिर येथे कलावती आईंच्या सेवेला गेल्या होत्या. सेवा आटोपून घरी परतताना 4.45 च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी त्यांना गाठले.
पुढे 2-3 खून झाले आहेत. तुमचे दागिने काढून द्या, आम्ही कागदात बांधून देतो, असे भामटय़ांनी कमल यांना सांगितले. सुरुवातीला कमल यांनी भामटय़ांचे ऐकले नाही. आपण सध्या घरी जात आहोत, येथून जवळच आपले घर आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. तरी भामटे ऐकले नाहीत. त्यांच्या गळय़ातील बोरमाळ, हातातील बांगडय़ा काढून घेऊन कागदात गुंडाळून त्यांच्या पर्समध्ये ठेवले. दागिने बांधलेला पुडा पर्समध्ये ठेवून भामटे दुचाकीवरून निघून गेले.
थोडय़ावेळाने कमल यांनी पुडी सोडून पाहिली असता त्यात दोन पितळी बांगडय़ा होत्या. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. टिळकवाडी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.









