चौघा जणांना अटक, मारिहाळ पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
करडीगुद्दीजवळ गुरुवारी सायंकाळी घडलेली तुंबळ हाणामारी, तलवार हल्ला क्षुल्लक कारणावरून झाली आहे. मारिहाळ पोलिसांनी चौघा जणांना अटक केली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
दोड्डाप्पा गंपाप्पा अरबळ्ळी (रा. करडीगुद्दी), लक्काप्पा बसाप्पा हळ्ळी (रा. मारिहाळ), भरमोजी गंगाप्पा अरबळ्ळी, बसवंत बसवाणी करविनकोप्प (दोघेही रा. करडीगुद्दी) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी ही माहिती दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेला मुदकाप्पा चंद्राप्पा अंगडी (वय 25, रा. सुनकुप्पी, ता. बैलहोंगल) हा आपल्या अन्य मित्रांसमवेत बोलेरोतून गावी जात होता. न्यायालयातील एका खटल्यात हजर राहण्यासाठी हे सर्वजण बेळगावात आले होते. कॅम्बेल स्टोअरसमोर नागेश नामक एक मित्र भेटला. मित्रासमवेत बोलत असताना एका मद्यपीने बोलेरोची काच फोडली. त्याला जाब विचारल्यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवार, विळा आदी शस्त्रांचा वापर करण्यात आला. या हाणामारीत मुदकाप्पा अंगडी याचा मृत्यू झाला. अन्य सातजण जखमी झाले. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अत्यंत क्षुल्लक कारणावरून हा राडा झाला आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.









