युद्धाच्या प्रारंभीच्या काळात युक्रेनने गमावलेली काही खेडी आणि दोन छोटी शहरे आता पुन्हा परत मिळविली आहेत, असे प्रतिपादन अमेरिकेने केले आहे. या युद्धात आता रशियाची आगेकूच मोठय़ा प्रमाणात रोखण्यात युक्रेनला यश येताना दिसत आहे. रशियाने मात्र आक्रमणाची धार वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अत्याधुनिक युद्ध विमानांचा उपयोग करणार असल्याचे स्पष्ट केले.
युक्रेनच्या स्लोबोदा आणि ल्युकाशिवका ही खेडी आता युक्रेनच्या ताब्यात पुन्हा आली आहेत. ही छोटी घडामोड असली, तरी युक्रेनच्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढविण्यास पुरेशी ठरु शकते, असे या यशासंबंधात अमेरिकेचे मत आहे. राजधानी कीव्हचे संरक्षण करण्यात आजवर युपेनला यश आले आहे. युद्धाच्या प्रथम आठवडय़ातच रशियन सेना कीव्ह पर्यंत पोहचल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांना फारशी प्रगती साधता आलेली नाही. गेले पाच आठवडे येथे तळ ठोकून बसलेल्या या सैन्याला कीव्हमध्ये घुसता आलेले नाही. उलट आता युक्रेनचे सैनिकच रशियाशी दोन हात करीत असल्याचे दिसत आहे.









