ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :
राज्यात उष्णतेची लाट असून, मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्यात तापमान चाळीशीपार पोहचले आहे. जळगावनंतर आता उस्मानाबादेतही एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. लिंबराज सुकाळे (वय 50, हसेगाव, ता.कळंब ) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
लिंबराज सुकाळे हे गुरूवारी दुपारी शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिले. पाणी पित असतानाच त्यांना उष्माघाताचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना कळंबमधील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आलं. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, यापूर्वी जळगावमध्ये एका शेतकऱ्याचा उष्णाघाताने मृत्यू झाला होता. जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या 33 वषीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी होते. भर उन्हात शेतातील काम करुन घरी येत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
राजस्थान तसेच गुजरातकडून वाहणाऱ्या अतिउष्ण तसेच कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेच्या लाटेचा मुक्काम 2 एप्रिलपर्यंत राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतरही काही दिवस तापमानातील वाढ कायम राहिल, त्यामुळे नागरिकांनी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, शेतकऱ्यांनी जनावरांना सावलीत बांधावे, नवीन लागवड केलेल्या फळ झाडांना सावली, अच्छादन करावे, असे आवाहन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मौसम सेवा केंद्रातील प्रमुख प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.