प्रतिनिधी /मडगाव
सोनसोडय़ावरील कचरा प्लांटची संरक्षक भीत पडल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी काल मडगाव नगरपालिकेची विशेष बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थितीत करून पालिकेच्या अधिकाऱयांना धारेवर धरले. खास करून पालिकेचे अभियंते नगरसेवक व नगराध्यक्षांना चुकीची माहिती पुरवित असल्याचा आरोप कालच्या बैठकीत करण्यात आला.
सोनसोडय़ावरील कचरा प्लांटची भीत कोसळल्याने ती पुन्हा उभारण्यासाठी पालिका संचालनालयाने आर्थिक मदत करावी यासाठी त्यांच्याकडे पत्रव्यहार करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेतल्याची माहिती नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी पत्रकारांना दिली. तसेच सोनसोडय़ावरील कचरा प्लांटला विद्यूत पुरवठा होत नसल्याने त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव असून त्यालाही आर्थिक मदत करावी यासाठी पालिका संचालनालयाकडे पत्रव्यहार केला जाणार आहे. पालिका संचालनालय 15व्या विद्य आयोगामार्फत आर्थिक मदत करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सोनसोडय़ावरील कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी फॉमेन्तो कंपनीनेकडे पालिकेने तीन वर्षासाठी करार केला होता. परंतु, हा करार पूर्ण होण्यापूर्वीच फॉमेन्ताकडील करार रद्द करण्यात आला. त्याला फॉमेन्तोने लवादाकडे आव्हान दिले. त्यामुळे पालिकेला आत्ता 35 कोटी रूपये फॉमेन्तोला द्यावे लागत आहे. या मुद्दावरून नगरसेवक घनश्याम प्रभू शिरोडकर यांनी प्रश्न उपस्थित करून पालिकेच्या अधिकाऱयांना धारेवर धरले.
फॉमेन्तो लवादाकडे गेल्याने, त्याला पालिकेने आव्हान दिले पाहिजे होते. मात्र, पालिकेच्या अधिकाऱयांनी त्या संदर्भात प्रक्रियाच केली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अधिकाऱयांनी आव्हान याचिके संदर्भात पालिकेच्या वकिलांना कल्पना दिल्याचे सांगितले. मात्र, सद्याची परिस्थिती काय आहे हे सांगण्यात पालिकेचे अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरले.
पालिकेचे 35 कोटी सहज देणार का ?
कचऱयावर प्रक्रिया करण्याचा करार तीन वर्षाच्या आत मोडीत काढल्याने फॉमेन्तोने लवादाकडे दाद मागितली. त्या प्रमाणे पालिकेने आत्ता 35 कोटी फॉमेन्तोला द्यावे लागणार आहे. या मुद्दावर बोलताना नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी पालिकेचे 35 कोटी रूपये सहज काढून देणार का ? असा सवाल उपस्थित केला. पालिकेला आपल्या कर्मचाऱयांना वेतना देताना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. महसूल प्राप्तीकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत 35 कोटी रूपये देणार की, त्याला आव्हान देणार असा सवाल उपस्थित करण्यात आला.
सोनसोडय़ावरील यंत्र सामुग्रीचा विमा उतरविला होता का असा सवालही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. मात्र, पालिकेने यंत्र सामुग्रीचा विमा उतरविला नव्हता हे कालच्या बैठकीत स्पष्ट झाले. या विषयावरून नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी नगराध्यक्ष लिंडन परेरा यांना घेरले. पालिकेच्या मालकीच्या महत्वाच्या वस्तुचा विमा उतरविला पाहिजे हे नगराध्यक्षांना ठावूक नाही का ? अस सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर बोलताना नगराध्यक्ष म्हणाले की, पालिका मालकीच्या महत्वाच्या वस्तुचा विमा उतरविण्याचे काम आत्ता हाती घेतले जाणार आहे.
नगराध्यक्षांची दिशाभूल ?
सोनसोडय़ावर कचऱयावर प्रक्रिया करणारी मशिनरी चालत नसल्याची माहिती पालिकेच्या अभियंत्यांनी बैठकीत दिली. पण, याच अभियंत्यांनी नगराध्यक्ष लिंडन परेरा यांची दिशाभूल केल्याचे काल स्पष्ट झाले. सोनसोडय़ावरील मशिनरी व्यवस्थित चालत असल्याचे नगराध्यक्ष प्रसार माध्यमांना सांगत आले होते. परंतु, कालच्या बैठकीत खुद्द अभियंत्यांनी मशिनरी चालत नसल्याचे सांगून, त्यांनी नगराध्यक्षांची दिशाभूल केल्याचे काल स्पष्ट झाले.
कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी सोनसोडय़ावरील ओला कचरा हटविण्या येणार असल्याचे नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी सांगितले. त्यासाठी कंत्राट दिले जाईल असेही स्पष्ट केले.









