कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील शरदनगर येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या डॉ.श्रीकांत नाथा सूर्यवंशी (वय ४१, मुळगाव मांजर्डे ता.तासगाव) यांनी राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत श्रीकांत सूर्यवंशी गेल्या आठ दिवसापासून शरदनगर येथे अशोक व्हनकडे यांच्य भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांचा दवाखानाही भाड्याच्या खोलीत होता. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सूर्यवंशी यांनी राहत्या खोलीतच गळफासाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत घरमालक अशोक व्हनकडे यांनी कुपवाड पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, डॉक्टरांनी गळफासाने आत्महत्या का केली? याबाबत नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.