भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभुषण सिंह यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त शाहू खासबाग मैदानात राष्ट्रीय स्तरावरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणार असल्याची माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांची दिली. सिंह यांनी खासदार युवराज संभाजीराजे यांची छत्रपती यांची भेट घेऊन त्यांना कुस्ती स्पर्धा आयोजनाची माहिती दिली.
क्रीडाप्रेमी राजा असणाऱया राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत कुस्तीला प्रचंड प्रोत्साहन दिले. कुस्ती या क्रीडा प्रकारात आमूलाग्र बदल घडविण्याचे श्रेय हे राजर्षी शाहू महाराजांनाच जाते. यावर्षी 6 मे पासून महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यानिमित्त, राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीच्या वृद्धीसाठी दिलेले अमूल्य योगदान व या क्षेत्रात केलेले लोकोत्तर कार्य यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांनी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खासबाग कुस्ती मैदानात ‘हिंदकेसरी’ सारख्या राष्ट्रीय पातळीवरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करावे, या मागणीसह खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री बृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावर, हिंदकेसरी स्पर्धा ही न्यायालयीन कचाटय़ात अडकली असल्याने तितकीच प्रतिष्ठित अशी राष्ट्रीय पातळीवरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी संभाजीराजे यांना दिली. यामुळे, छत्रपती शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच कुस्ती या खेळालाही त्याचा भरीव फायदा होईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बृजभूषण यांना शाहू महाराजांविषयी आदरभाव : संभाजीराजे
संभाजीराजे म्हणाले की, उत्तरप्रदेशचे रहिवासी असलेले खासदार बृजभूषण हे स्वतः एक उत्तम मल्ल आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान हे त्यांना चांगलेच माहीत आहेत. मी शाहू महाराजांच्या विचार कार्याबद्दल त्यांना माहिती देत असताना ते भारावून गेले. महाराजांप्रती त्यांच्या मनी असणारा आदरभाव व कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना छत्रपती शाहू महाराजांचा हिंदी भाषेतील चरित्र ग्रंथ भेट दिला.