ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जम्मू-काश्मीर सरकारने पाच सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यामध्ये दोन पोलीस, एक शिक्षक, एक कॉम्प्युटर ऑपरेटर आणि एका मदतनीसाचा समावेश आहे.
पोलीस हवालदार तौसीफ अहमद (मीर, पुलवामा) संगणक ऑपरेटर गुलाम हसन परे (श्रीनगर), शिक्षक अर्शीद अहमद दास (अवंतीपोरा) पोलीस हवालदार शाहिद हुसेन (राथेर, बारामुल्ला) आणि आरोग्य विभागातील शराफत ए खान (कुपवाडा) अशी बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
जम्मू-काश्मीर सरकारमध्ये नोकरी करतानाच दहशतवाद्यांचे ओव्हरग्राउंड वर्कर म्हणून हे पाच जण काम करत होते. त्यामुळे या पाच सरकारी नोकरांना बडतर्फ करण्याची शिफारस जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचाऱयांना नियुक्त करणाऱ्या एका समितीने सरकारकडे केली होती. त्याला अनुसरून जम्मू-काश्मीर प्रशासनाने आज या पाच सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. या सर्वांना भारतीय संविधानातील कलम 311(2) (सी) अंतर्गत बडतर्फ करण्याची शिफारस या समितीने केली होती.