निफ्टी 17,300 अंकांच्या वर : दुसऱया सत्रात सेन्सेक्स मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारात दुसऱया सत्रात मंगळवारी तेजीचे वातावरण राहिले होते. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 350 अंकांच्या लाभासोबत बंद झाला होता. हे उत्साहाचे वातावरण राहण्यासाठी जागतिक बाजारांमधील सकारात्मक स्थितीचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि इन्फोसिस यांचे समभाग वधारल्याचा प्रभाव बाजारावर झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 350.16 अंकांनी मजबूत होत 57,943.65 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 103.30 अंकांनी वधारत 17,325.30 वर बंद झाल्याचे दिसून आले. काहीकाळ सेन्सेक्स 408.04 अंकांच्या तेजीसह कार्यरत होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये दिवसभरात एचडीएफसी, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, डॉ.रेड्डीज लॅब, सन फार्मा, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग प्रामुख्याने लाभासह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, टाटा स्टील, भारतीय स्टेट बँक, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह आणि एनटीपीसी यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
प्रमुख घटनांचा परिणाम
मागील महिन्याभरापासून सुरु असणाऱया युक्रेन व रशिया यांच्यात पुन्हा तुर्की या ठिकाणी शांततेसाठी चर्चा करण्यात येणार असल्याच्या बातम्याच्या अगोदरच युरोपमधील मुख्य बाजारातील निर्देशांक तेजीत राहिले होते. याचा सकारात्मक परिणाम हा भारतीय भांडवली बाजारावर झाल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.
जागतिक पातळीवरील विविध कंपन्यांमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग लाभात राहिले, तर चीनचा शांघाय कम्पोझिट काही प्रमाणात नुकसानीत राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.52 टक्क्यांनी वधारुन 113.1 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले.









