परिवहन मंडळाच्या केंद्रीय तपास पथकाची कामगिरी
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱया प्रवाशी महिलेने विसरलेला मोबाईल संबंधित महिलेला परत करण्यात आला. परिवहन मंडळाच्या केंद्रीय तपास विभागाच्या पथकाने बेंगळूर येथे महिलेकडे मोबाईल सुपूर्द केला आहे.
वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या केए 22 एफ 2296 क्रमांकाची बस 14 मार्च रोजी बेळगावहून बेंगळूरला जात होती. याच बसमध्ये हरिहरहून बेंगळूरला जाणाऱया सुनिता पी. यांनी बेंगळूर येथे बसमधून उतरल्यानंतर आपला मोबाईल बसमध्येच सोडून गेल्या.
मोबाईल विसरल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने कर्मचाऱयांकडे चौकशी केली. मात्र आपल्याला मोबाईल विषयी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले होते. परिवहन मंडळाच्या ट्राफीक विभागाच्या मुख्य व्यवस्थापकांना या संबंधीची माहिती मिळताच बस बेंगळूरहून बेळगावला पोहोचल्यानंतर कर्मचाऱयांकडून मोबाईल ताब्यात घेतला. 25 मार्च रोजी बेंगळूर येथे सुनिता यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात आला.









