कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर-प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण सोहळ्याचा वाद चिघळला असून पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हरिनाम सप्ताह निमित्त रिंगण सोहळ्याचे नियोजन केले होते. पण भारत बटालियनच्या आरक्षित जागेवर हे रिंगण सोहळा आयोजित केल्याने त्यावर बटालियनने आक्षेप घेतल्याने हा प्रकार घडला.
भारत बटालियनच्या भूमिकेमुळे वारकरी संतप्त झाल्याने तणावाचे वातावरण तयार झाले. कोणत्याही परिस्थितीत हा रिंगण सोहळा सुरू ठेवण्याचा प्रयत्न वारकऱ्यांनी सुरू ठेवला होता. मात्र भारत बटालियनने केलेल्या विरोधामुळे वारकरी आक्रमक बनले. त्यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट होऊन धक्काबुक्कीचा प्रसंग घडला. यामध्ये काही वारकरी जखमी असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र याला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, हा वाद चालू असताना पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे वाद निवळला, मात्र अजूनही वातावरण तणावपुर्ण बनले आहे.
हरिनाम सप्ताह निमित्त आज नंदवाळ ता.करवीर येथे रिंगण सोहळा होणार होता. मात्र ती जागा भारत बटालियनच्या नावे असल्याने त्याला बटालियन विरोध केला होता. आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावरुन वाद सुरु असून तो आता चिघऴला आहे. भारत बटालियनसाठी असलेल्या आरक्षित जागेत रिंगण सोहळा करण्याचा वारकऱ्यांचा आग्रह होता.