बुकलव्हर्स क्लबच्या कार्यक्रमात मीना कुलकर्णी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /बेळगाव
संस्कृत भाषा ही मृत भाषा मुळीच नाही. ज्ञानदायिनी, आनंददायिनी व ज्ञानभांडार असलेली ही भाषा आहे. त्यात मानवतावादी विचार आहे. म्हणून आजुबाजूला उपलब्ध असलेल्या विविध वर्गातून छोटय़ा अभ्यासक्रमांतून संस्कृत शिकण्याचा प्रयत्न जरूर करावा, असे आवाहन मीना कुलकर्णी यांनी केले.
लोकमान्य ग्रंथालयात आयोजित बुकलव्हर्स क्लबच्या कार्यक्रमात त्या ‘संस्कृत भाषेचे महत्त्व’ या विषयावर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आज एम.बी.ए.सारख्या आधुनिक अभ्यासक्रमाचा अभ्यास करणाऱयांना रामायण, महाभारत हे पूरक ग्रंथ म्हणून वाचण्याची शिफारस केली जाते. साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान, सुभाषित, श्लोक, योगशास्त्र, आयुर्वेद, युद्धशास्त्र, राजकारण, नाटय़शास्त्र, स्थापत्य, व्याकरण, शिल्प, कला, संगीत या इतर अनेक विषयांचे ज्ञान संस्कृतमधूनच उपलब्ध होते. तुझे आहे तुझपाशी अशी आपली अवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. सचिव किशोर काकडे यांनी स्वागत व परिचय करून दिला.









