सांगली प्रतिनिधी
प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही पोलिसांना चकवा देत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांनी ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे रविवारी आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकार्पण केले. पडळकर यांच्यासह माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे माजी आमदार नितीन शिंदे दिनकर पाटील दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी महापौर संगीता खोत, भाजपा नेते शेखर इनामदार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये पडळकर यांनी स्मारकाच्या दिशेने आगेकूच करत पोलिसांना घाम फोडला. कार्यकर्ते आक्रमक असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पण शेवटी पडळकर यांनी गनिमीकाव्याने ड्रोन द्वारे पुष्पवृष्टी करत अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण केले. लोकार्पण झाल्याचे पडळकर यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.