ऑनलाईन टीम / मुंबई :
रशिया-युक्रेन युद्धाला 32 दिवस उलटले तरी देखील हे युद्ध शमण्याचे नाव घेत नाही. रशियाकडून युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांवर सातत्याने हल्ले सुरूच आहेत. रशियाने रविवारी युक्रेनच्या मारिओपोल आणि लव्हेल शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचं वक्तव्य समोर आलं आहे. आम्ही रशियन क्षेपणास्त्रांना मशीनगन्स आणि शॉटगनने तोंड देऊ शकत नाही, आम्ही शस्त्रांची वाट पाहून थकलो आहोत. आता मारिओपोल वाचविणे शक्य नाही, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
झेलेन्स्की म्हणाले, रशियाला रोखण्यासाठी आम्हाला रणगाडे आणि विमानांची गरज आहे. पोलंडचे अध्यक्ष आंदेझेज डूड यांच्याशी झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत झेलेन्स्की यांनी निराशा व्यक्त करताना म्हटले की युक्रेनला पोलिश मिग-29 विमान न मिळाल्यामुळे मी निराश झालो आहे. केवळ मशीनगन्स आणि शॉटगनने रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही. युद्धामुळे शस्त्रास्त्रांची कमतरता भासत आहे. युरोपीयन देशांकडून शस्त्रास्त्रांच्या मदतीची वाट पाहून थकलो. आता मारिओपोल वाचविणे शक्य नाही.
दरम्यान, शनिवारी रशियाकडून युद्धाची रणनीती बदलत असल्याचे संकेत मिळाले. रशियन लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, युपेनमधील युद्धाचा पहिला टप्पा आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आता आम्ही दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करत आहोत. डोनाबासवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे हे आमचे ध्येय आहे.