पाच राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांच्या लवकरच नियुक्त्या : निवडणुका होणाऱया राज्यांवर विशेष नजर ठेवणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस संघटनेत व्यापक फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार येत्या 15 दिवसांत मोठे बदल केले जाऊ शकतात. याअंतर्गत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले जातील. याशिवाय काही राज्यांमध्ये सरचिटणीस आणि सचिवही बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच राज्यांबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसह इतर काही राज्यांमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेस हायकमांडच्या पातळीवर नव्या रणनीतीवर काम सुरू आहे. राज्य संघटनेतील नेत्यांमधील नाराजी व संघर्ष दूर करण्यावर हायकमांडनी लक्ष केंद्रित केले आहे.
काँग्रेस संघटनेतील गटबाजी आणि नाराजीमुळे पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पक्षाला पराभव पत्करावा लागल्याचे निरीक्षण वरिष्ठांकडून नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका होणाऱया राज्यांमध्ये पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्षश्रे÷ाrंकडून नेत्यांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकतीच हिमाचल प्रदेशातील नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली आणि त्यांना गटबाजी संपवण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी, शुक्रवारी राहुल गांधी यांनी यासंदर्भात हरियाणातील नेत्यांची भेट घेतली. आपापसातील वाद संपवून पक्षासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले. तूर्तास, प्रत्येक नेत्याला आपला वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला असून राज्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.
गुजरातमध्ये मजबुतीवर भर
गुजरातमध्ये या वषी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. तेथील भाजपचा मजबूत बालेकिल्ला भेदणे हे काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. संघटना मजबूत करण्यासाठी 25 नवे उपाध्यक्ष, 75 सरचिटणीस आणि 17 शहर व जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केल्याने काँग्रेसचे गुजरातबाबतचे गांभीर्य लक्षात येते. काही महिन्यांपूर्वी पक्षाने राजस्थानचे रघु शर्मा यांना गुजरातचे प्रभारी बनवले होते. आता ते आगामी निवडणुकीत पक्षाला कितपत यश मिळवून देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मध्यप्रदेशमध्येही बदल अपेक्षित
20 महिन्यांनंतर म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेसची कमान कमलनाथ यांच्याकडे आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षासोबतच विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत. आगामी काळात कमलनाथ यांच्यावर एकच जबाबदारी उरणार असल्याची चर्चा आहे. संघटनेची जबाबदारी दुसऱया नेत्याकडे दिल्यास पुढील वषी होणाऱया विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपशी टक्कर देता येईल, असे ठोकताळे वर्तवले जात आहेत.









