चंदिगढ
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांचे आणखी दोन प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी म्हणून नाव दिले आहे. यामध्ये वादग्रस्त पोस्टर लावणे आणि श्री गुरु ग्रंथ साहिबचे पवित्र भाग मिळवणे या मुद्यांचा समावेश आहे. पंजाब पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर फरीदकोट न्यायालयाने आता डेराप्रमुखाला याप्रकरणी 4 मे रोजीच्या सुनावणीत सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. बाबा रामरहीम सध्या हरियाणातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगात बंद आहे. विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीत राम रहीमने अकाली दल आणि भाजपला पाठिंबा दिला होता. राम रहीमला केवळ निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी 21 दिवसांची विशेष पॅरोल रजा देण्यात आल्याचीही चर्चा त्यावेळी होती.









