युक्रेन-रशिया युद्धाला आता एक महिना झाला आहे. युक्रेनने रशियाचा प्रतिकार चालविला असला तरी, आता त्याचे बळ काहीसे कमी पडत आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे युक्रेनने अमेरिकेकडून प्रतिदिन 500 जॅव्हलिन क्षेपणास्त्रे पुरविण्याची मागणी केली आहे. 500 जॅव्हलिन आणि स्टींगर क्षेपणास्त्रे पुरविल्यास रशियाला माघार घ्यायला लावू, असा दावा युपेनने केला.
युपेनचा प्रतिकाराचा निर्धार मोठा असला तरी, शस्त्रास्त्रांची संख्या त्याच्याकडे कमी आहे. रशियाने 300 रणगाडे या देशात सोडले असून त्यांना नष्ट करण्यासाठी अमेरिकेची जॅव्हलीन क्षेपणास्त्रे उपयोग ठरत आहे. आणखी 2,500 रणगाडे रशियाने सज्ज ठेवले असल्याचेही वृत्त आहे. या सर्व रणगाडय़ांना थोपवायचे असल्यास युक्रेनला पुढचे आठ ते दहा दिवस प्रतिदिन 500 जॅव्हलिन क्षेपणास्त्रांची आवश्यकता असून ती पुरविली जावीत, अशी मागणी आहे.
विमानांसाठी स्टींगर क्षेपणास्त्रे
रशियाची 800 हून अधिक विमाने युक्रेनच्या आकाशात घिरटय़ा घालत असून जवळपास प्रत्येक शहरावर बाँब वर्षाव सुरु आहे. या विमानांना पिटाळण्यासाठी किंवा पाडण्यासाठी अमेरिकेची स्टींगर क्षेपणास्त्रे उपयोगी ठरत आहे. त्यामुळे त्या क्षेपणास्त्रांची मागणीही मोठय़ा प्रमाणात युक्रेनकडून केली जात आहे.









