बिहारच्या दशरथ मांझी यांचे नाव सध्या राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. त्यांनी एक हातोडा आणि छिन्नी एवढय़ाच साधनांनी एक मोठा पहाड फोडून 360 फूट लांब आणि 30 फूट रुंद रस्ता एकहाती तयार करण्याचा अद्भूत चमत्कार घडवून दाखविला आहे. अशाचतऱहेची कामगिरी बुंदेलखंड येथील पुष्पेंद्र यांनी केली आहे.
बुंदेलखंड हा एकेकाळचा सुजलाम सुफलाम प्रदेश. सध्या दुष्काळ आणि पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करीत आहे. सातत्याने दुष्काळाच्या संकटाशी झुंजणाऱया या प्रदेशाला पुष्पेंद्र यांच्या प्रयत्नांचे वरदान लाभले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आता दूर झाली आहे.
बुंदेलखंडच्या पाणीसमस्येवर उपाय कोणता करावा? या प्रश्नाचा ध्यास पुष्पेंद्र यांनी घेतला होता. या प्रदेशात 50 हजाराहून अधिक तलाव आणि तळी आहेत. तथापि, योग्य देखभाल न केली गेल्याने त्यातील बहुतेक तळी कोरडी पडली आहेत. पाण्याचा उपसा न झाल्याने काही तळय़ांमध्ये शेवाळ साचले असून पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी या तलावांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार केला. 25 वर्षांचे अखंड परिश्रम आणि लोकांचे प्रबोधन या माध्यमातून त्यांनी अनेक तलाव पुनर्जिवीत केले आहेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवे तलावही खोदले आहेत. हे कार्य त्यांनी एक संस्था स्थापन करून केले आहे. त्यांच्या या महान कार्याची फळे आता येथील जनतेला चाखावयास मिळत असून जवळपास 2 लाख हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. तसेच भूगर्भात 21 कोटी घनमीटर पाणी अतिरिक्त साठत आहे. काही ठिकाणी भूजलाचा स्तर साडेतीन मीटर उंचावला आहे.
2006 मध्ये बुंदेलखंडात भीषण दुष्काळ पडला होता. अनेक शेतकऱयांनी त्यामुळे आत्महत्या केल्या होत्या. पुष्पेंद्र यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आता येथे शेतकऱयांच्या आत्महत्यांचे प्रमाण अत्यल्प पातळीवर आले आहे. तलावांच्या निर्मितीबरोबरच वृक्षारोपण आणि पर्यावरणाशी संबंधित इतर कामेही ते करतात. त्यामुळे काही भागात पर्जन्यमानही सुधारल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या कार्याचा सुपरिणाम बघून आता लाखो हात त्यांच्या साहाय्यासाठी पुढे आले आहेत. श्रमदान तसेच आर्थिक साहाय्यासाठी अनेक जण सज्ज आहेत. आणखी 20 वर्षांत बुंदेलखंड हा जलमय प्रदेश बनविण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे.