कीव्हमध्ये क्षेपणास्त्राद्वारे रशियन रणगाडे नष्ट करतेय तेत्याना
रशियाच्या सैन्य सामर्थ्यासमोर किरकोळ वाटणारा युक्रेन 27 दिवसांनंतरही युद्धभूमीत निकराने लढा देत आहे. रशियाच्या सैन्याच्या विरोधात लढत असलेल्या युक्रेनच्या जनतेचा निर्धार यासाठी कारणीभूत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. अशाच प्रकारचा निर्धार तेत्याना चोर्नोवाल यांचाही दिसून येत आहे, त्या युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये सुरू असलेल्या भीषण लढाईत रशियाच्या सैन्यासाठी डेकेदुखी ठरल्या आहेत.
लेफ्टनंट तेत्याना या युक्रेनच्या माजी खासदार आहेत. परंतु सध्या ता अजोव बटालियनच्या सदस्यांसोबत मिळून प्रंटलाइन ट्रेंचेजमध्ये रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र युनिट सांभाळत आहेत. तसेच स्वतःच्या क्षेपणास्त्रांद्वारे दररोज रशियाचे अनेक रणगाडे उद्ध्वस्त करत आहेत.
माजी अध्यक्षांच्या घोटाळय़ांचा पर्दाफाश
खासदार म्हणून काम करण्यासह तेत्याना या शोध पत्रकार देखील राहिल्या आहेत. तेत्याना यांना युक्रेनच नव्हे रशियाची जनता देखील ओळखते. 2013 मध्ये त्यांनी रशिया समर्थक युक्रेनचे अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांचे घोटाळे शोधपत्रकारितेतून जगासमोर आणले होते. तेत्याना यांना यानुकोविच यांचे घोटाळे उघड करणे महागात पडले होते. त्यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये नाताळापूर्वी अत्यंत जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला भाडोत्री गुंडांनी केला होता. परंतु त्यांचा जीव वाचला होता. हा हल्ला यानुकोविच यांनी घडवून आणल्याचा आरोप झाला होता. तेत्याना यांच्यावर हल्ला करणाऱयांना रशियाने राजनयिक आश्रय दिला होता. तेत्याना यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी जगभरातून रशियावर टीका झाली होती.
पतीला आले होते वीरमरण
तेत्याना यांचे पती माएकोला बेरेजोवई हे अजोव बटालियनचे सक्रीय स्वयंसेवक होते. माएकोला 8 ऑगस्ट 2014 रोजी पूर्व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान हुतात्मा झाले होते. त्यावेळी तेत्याना देखील युद्धात भाग घेत अजोव बटालियनाच्या मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेत सर्वांना चकित केले होते. स्वतःच्या पतीला श्रद्धांजली वाहण्याची ही पद्धत असल्याचे तेत्याना यांनी म्हटले होते.
भ्रष्टाचारविरोधी मोहीम
दोन वर्षांपूर्वी तेत्याना यांच्यावर युक्रेनमधील प्रसिद्ध भ्रष्टाचारविरोधी मोहीम यूरोमेडनदरम्यान शासकीय अधिकाऱयांच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप करण्यात आला होता. तेत्याना यांनी यूरोमेडनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे आंदोलन कीव्हच्या मेडन नेजलेझोंस्ती (इंडिपेंडन्स स्क्वेअर) येथे 21 नोव्हेंबर 2013 रोजी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठय़ा प्रमाणावर लोक एकत्र आल्याने सुरू झाले होते. या आंदोलनाला मेडन अपस्प्रिंग या नावानेही ओळखले जाते.
यानुकोविच पायउतार
फेब्रुवारी 2014 मध्ये मेडन रिव्हॉल्युशनपर्यंत (रिव्हॉल्युशन ऑफ डिग्निटी)च्या सुरुवातीपर्यंत हे आंदोलन चालले होते. या रिव्हॉल्युशनमध्ये 18-23 फेब्रुवारीपर्यंत जनतेने कीव्हच्या शासकीय इमारतींवर नियंत्रण मिळविले होते. यादरम्यान सैन्याकडून झालेल्या गोळीबारात अनेक जण मारले गेले होते. हे आंदोलन तत्कालीन अध्यक्ष यानुकोविच यांनी राजीनामा दिल्यावर संपुष्टात आले होते.









