शहापूर, वडगाव, जुने बेळगावात रंगपंचमीचा उत्साह : फुलांची उधळण करून साजरी झाली प्रदूषणमुक्त रंगपंचमी

प्रतिनिधी /बेळगाव
मराठी व हिंदी गाण्यांच्या तालावर थिरकत मंगळवारी दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उत्साहपूर्ण वातावरणात वडगाव, शहापूर, जुने बेळगाव येथे रंगपंचमी साजरी करण्यात आली. परंपरेप्रमाणे पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी झाली. सर्वत्र डीजेचा दणदणाट व रेनडान्समध्ये बेधुंद होऊन नाचणारी युवा पिढी दिसत होती. एकमेकांना रंग लावत महिलांसह युवतींनी हा रंगोत्सव साजरा केला.
होळीच्या दुसऱयाच दिवशी बेळगाव शहरात रंगपंचमी साजरी झाली. शहापूर, वडगाव, जुने बेळगाव परिसरात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. मंगळवारी रात्रीपासूनच रंगपंचमीसाठीची तयारी सुरू होती. अनेक गल्ल्यांमध्ये पाण्याचे शॉवर बसविण्यात आले होते. डीजे लावण्यासाठी ट्रक्टर, ट्रॉली यांची जमवाजमव करण्यात येत होती. रंग, पिचकाऱया, मुखवटे खरेदीसाठी शहापूर येथील खडेबाजार तर वडगाव बाजार गल्ली येथे नागरिक व बालचमुंची गर्दी झाली होती.
मंगळवारी सकाळपासूनच रंगपंचमीसाठीचा उत्साह दिसून आला. मागील दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधांमुळे रंगपंचमी साजरी झाली नव्हती. त्यामुळे यावषी जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली. पाण्याच्या शॉवरखाली गाण्यांच्या तालावर थिरकताना युवा पिढी दिसत होती. याचबरोबर पाईपमधूनही त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारला जात होता. शहापूर येथील खडेबाजार, कचेरी गल्ली, पवार गल्ली, गणेशपूर गल्ली, बसवाण गल्ली, दाणे गल्ली, भारतनगर, खासबाग, जुने बेळगाव, नाझर कॅम्प, बाजार गल्ली, रामदेव गल्ली, कारभार गल्ली, पाटील गल्ली या परिसरात डीजेवर शेकडो तरुण थिरकत होते.
चर्चा घोडय़ावरूनच्या एंट्रीची
कारभार गल्ली, वडगाव येथील एक तरुण चक्क घोडय़ावरून रंगपंचमीला दाखल झाला. तो घोडय़ाच्या पाठीवर बसून डीजेच्या तालावर थिरकत होता. घोडय़ावरून दाखल झालेल्या तरुणाला पाहण्यासाठी बालचमूंची उत्सुकतेपोटी गर्दी झाली होती. अनेकांनी त्याच्यासोबत फोटोही काढून घेतले. पाचवा क्रॉस, नाझर कॅम्प येथे गोणपाटापासूनचा तयार केलेला ड्रेस घालून वेणी घातलेले काहीजण दिसून आले. ही वेगळी वेशभूषा पाहण्यासाठी गर्दी होत होती. याचबरोबर अनेक ठिकाणी राक्षसाचे व इतर मुखवटे घालून तरुणाई सहभागी झाली होती.
फुलांची उधळण करीत प्रदूषणमुक्त रंगपंचमी
प्रदूषणमुक्त रंगपंचमी साजरी व्हावी या उद्देशाने कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रति÷ानतर्फे मागील काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. नवी गल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करण्यात आली.
प्रति÷ानचे अध्यक्ष मालोजी अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. डीसीपी रविंद्र गडादी यांनी या उ पक्रमाचे कौतुक केले. यावेळी एसीपी एन. व्ही. बरमनी, एसीपी कट्टीमनी, सीपीआय विनायक बडीगेर, नगरसेवक रवी साळुंके, नगरसेवक नितीन जाधव, संजय किल्लेकर, गोपाळ बिर्जे, अर्जुन देमट्टी, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, विजय भोसले, राजू बिर्जे, सुधीर कालकुंदीकर, बापू जाधव यासह इतर उपस्थित होते.









