काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दांडगाईचा भाजपाकडून निषेध
प्रतिनिधी /वास्को
रंगपंचमीच्या दिवशी वास्को बोगदा येथील दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात जे काही कायदय़ानुसार करायचे आहे ते पोलीस करतील. पोलिसांना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगण्याची गरज नाही असे स्पष्ट करून विरोधी पक्षाचे आमदार दूरदूरहून मुरगावात येऊन पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप मुरगाव भाजपा मंडळ, भाजाप दक्षिण गोवा अध्यक्ष, मुरगावचे भाजपाचे नगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱयांनी केला आहे. निवडणुकीचा निकाल झाल्यापासून मुरगावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांविरूध्द दांडगाईचा वापर केलेल्याचा आरोप करून त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.
या घटनेसंबंधी भाजपातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला. त्या मारहाणीच्या घटनेत कोण होते आणि कोण नव्हते याचा तपास पोलीस करतील. कोण होते आणि कोण नव्हते हे सांगणारे काँग्रेसचे आमदार कोण असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला दक्षिण गोवा भाजपाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, प्रदेश कार्यकारीणी सदस्य जयंत जाधव, मुरगाव मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेवक प्रजय मयेकर, लियो रॉड्रिक्स, रामचंद्र कामत, दयानंद नाईक, दामोदर नाईक, मंजुषा पिळर्णकर, कुणाली मांद्रेकर, मुरगाव युवा अध्यक्ष योगेश बांदेकर, महिला अध्यक्ष छाया होन्नावरकर, शशिकांत परब व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांनी यावेळी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवसापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांविरूध्द कोणकोणत्या कारवाया केल्या याची माहिती दिली. व त्यांच्या दांडगाईचा निषेध केला. मुरगावात भाजपाने आपला पराभव खुल्या मनाने मान्य केल्याचे स्पष्ट करून मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी विजयामुळे विरोधक मात्र, आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करीत आहेत. हा प्रकार निषेधार्ह असून या प्रकाराविरूध्द पोलीस कारवाई व्हायलाच हवी असे ते म्हणाले. भाजपाच्या एखादय़ा कार्यकर्त्यांने त्यांना मारहाण केली असती तर त्यांनी पोलीस तक्रार करायला हवी होती. स्वता कायदा हातात घेण्याची गरज नव्हती. पोलिसांच्या उपस्थितीतच मयेकर यांच्या घरावर दगडफेक झालेली आहे. भाजपा पोलिसांवर दबाव आणीत नाहीत. कायदय़ानुसार पोलीस योग्य तीच कारवाई करतील. काँग्रेसच्या नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याची गरज नाही असे ते म्हणाले. मडगावात दिगंबर कामत आठ वेळा जिकेल असे म्हणतात. त्यांच्या मोती डोंगरावर काय घडत आहे. तीकडे लक्ष द्यायला हवे. इथे पोलिसांना मार्गदर्शन करू नये. मुरगावात यापूर्वी तीन वेळा भाजपाचा आमदार निवडून आला. मात्र, विरोधकांवर हल्ला करण्याचे प्रकार कधी घडलेले नाहीत असे तुळशीदास नाईक यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक प्रजय मयेकर यांनी आमदार मायकल लोबो यांच्यावर टीका करताना त्यांना बोगदय़ावरील वादाची सविस्तर माहिती हवी असल्यास मला भेटावे. नाहक चुकीची वक्तव्ये करू नयेत असे सांगितले. बोगदय़ावरील वाद दोन कुटुंबांमधील वाद असल्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी हल्ला करण्यात सहभाग का घेतला. त्यांनी प्रकरण मिटवले का नाही असे प्रश्न नगरसेवक मयेकर यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या कार्यकर्त्याची काळजी असल्यानेच मुरगावात आले होते. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी नव्हे असे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी स्पष्ट केले. त्यांनीही मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी करण्याच्या आमदार लोबो यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. नगरसेवक लियो रॉड्रिक्स, दामोदर नाईक, जयंत जाधव यांनीही गुन्हेगारांविरूध्द कारवाई होण आवश्यक असल्याचे सांगितले.









