वृत्तसंस्था/ बेलग्रेड
येथे सुरू असलेल्या विश्व इनडोअर ऍथलेटिक्स स्पर्धेत रविवारी स्वीडनचा पोल व्हॉल्टर आर्मंड डुप्लांटीसने पुरूषांच्या पोल व्हॉल्ट क्रीडाप्रकारात यापूर्वी स्वतःच नोंदविलेला विश्वविक्रम मागे टाकला.
22 वर्षीय ऑलिंपिक विजेत्या डुप्लांटीसने या क्रीडाप्रकारात 6.20 मी.चे अंतर नोंदवित नवा विश्वविक्रम केला. या क्रीडाप्रकारात ब्राझीलच्या बेझने 5.95 मी. अंतर नोंदवित रौप्यपदक तर अमेरिकेच्या निल्सेनने 5.90 मी.चे अंतर नोंदवित कास्यपदक मिळविले. डुप्लांटीसने चालू महिन्याच्या प्रारंभी बेलग्रेडमध्ये झालेल्या स्पर्धेत 6.19 मी. चे अंतर नोंदवित विश्वविक्रम नोंदविला होता. गेल्यावर्षी स्वीडनच्या डुप्लांटीसने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. आता तो येत्या जुलैमध्ये युगेनी येथे होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. 2018 च्या युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धेत डुप्लांटीसने सुवर्णपदक मिळविले होते.









