वृत्तसंस्था/ लाहोर
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सोमवारपासून सुरू झालेल्या शेवटच्या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने यजमान पाकविरूद्ध पहिल्या डावात 5 बाद 232 धावा जमविल्या. सलामीच्या उस्मान ख्वाजाचे शतक 9 धावांनी हुकले तर स्टीव्ह स्मिथने अर्धशतक (59) झळकविले.
24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ पाकमध्ये कसोटी मालिका खेळत असून या मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. त्यांचे दोन महत्त्वाचे फलंदाज केवळ 8 धावांत तंबूत परतले. शाहीन आफ्रिदीने सलामीच्या वॉर्नरला 7 धावांवर पायचीत केल्यानंतर त्याने आपल्या याच षटकांतील पाचव्या चेंडूवर लाबुशानेला खाते उघडण्यापूर्वी रिझवानकरवी झेल बाद केले.
उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 138 धावांची भगिदारी केली. स्मिथने 169 चेंडूत 6 चौकारांसह 59 धावा जमविल्या. नसीम शहाने स्मिथला पायचीत केली. स्मिथ बाद झाल्यानंतर ख्वाजा चौथ्या गडय़ाच्या रूपात तंबूत परतला. साजीद खानने ख्वाजाला कर्णधार आझमकरवी झेलबाद केले. त्याने 219 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 91 धावा जमविताना हेडसमवेत चौथ्या गडय़ासाठी 41 धावांची भर घातली. पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी नसीम शहाने हेडला झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 88 षटकांत 5 बाद 232 धावा केल्या. ग्रीन दोन चौकारांसह 20 तर कॅरे 1 चौकारांसह 8 धावांवर खेळत आहे. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी आणि नसीम शहा यांनी प्रत्येकी 2 तर साजीद खानने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 88 षटकांत 5 बाद 232 (उस्मान ख्वाजा 91, वॉर्नर 7, लाबुशाने 0, स्टीव्ह स्मिथ 59, हेड 26, ग्रीन खेळत आहे 20, कॅरे खेळत आहे. 8, शाहीन आफ्रिदी 2-39, नसीम शहा 2-36, साजीद खान 1-65).









