ऑनलाईन टीम / चंदीगढ :
आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये क्रिकेटपटू हरभजन सिंग, पंजाब ‘आप’चे सहप्रभारी राघव चढ्ढा, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक यांच्यासह लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल आणि कृष्णा प्राण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संजीव अरोरा या पाच जणांचा समावेश आहे.
हरभजन सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून तो राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरभजन सिंगला पंजाबमधील क्रीडा विद्यापीठाचा प्रमुख बनवलं जाऊ शकतं. त्याचबरोबर संदीप पाठक हा लंडनचा पदवीधर असून, पंजाबच्या विजयात त्याचा मोठा वाटा होता. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी नवनिर्वाचित आमदारांशी संवाद साधताना पाठक यांचे कौतुकही केले होते.
दरम्यान, 33 वषीय राघव चढ्ढा सर्वात तरुण राज्यसभा सदस्य असतील. अशोक मित्तल हे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ही जगातील सर्वात मोठय़ा खासगी विद्यापीठांपैकी एक आहे. पंजाबमधील शिक्षण क्षेत्रात ते फार पूर्वीपासून कार्यरत आहेत. त्याचबरोबर संजीव अरोरा हे लुधियानाच्या सर्वात मोठय़ा उद्योगपतींपैकी एक आहेत. ते कृष्णा प्राण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रस्ट चालवतात.