ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेले काही दिवस सुरु असलेलं युक्रेन – रशिया युद्ध काही केल्या थांबायला तयार नाही. दिवसें – दिवस विध्वंसक क्षेपणास्त्रांचा वापर करत युक्रेनला गुडघे टेकायला भाग पाडणे हा रशियाचा मनसुभा असुन, युक्रेन ही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या साऱ्यामुळे मात्र दोन्ही राष्ट्रांसह जगातील अनेक देशांची सामाजिक, अर्थिक, नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये मुख्यत: छोटी अर्थव्यवस्था असणारी राष्ट्रे, विकसनशील राष्ट्रे यांच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत.
भारत हा विकसनशील देश असल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेत देखील मोठ्या प्रमाणात बदल होत असुन याचे अनिष्ट परिणाम सामान्य नागरिकावर होत आहेत. महागाईने उपभोक्त्यांचं कंबरडं मोडलं आहे. मग ते पेट्रोल असो किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू असो. त्यातच आता भर म्हणून येणाऱ्या काळात ग्राहकांना दैनंदिन वापराच्या उत्पादनांसाठी त्यांचा खिसा अधिक मोकळा करावा लागणार आहे.
गहू, तेल आणि इतर पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय, रशिया-युक्रेन युद्धामुळे एफएमसीजी कंपन्यांना धक्का बसला आहे. या युद्धामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलांच्या किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचं मत या कंपन्यांनी मांडलं आहे. तसेच या कंपन्यांनी म्हटलं आहे की, या वाढीचा काही भार उपभोक्त्यांना उचलावा लागू शकतो. त्यामुळे सामान्यांना आपले अर्थिक गणित बसवताना चांगलीच तारांबऴ उडू शकते.
.