ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे पाकिस्तानच्या कराचीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान उतरवल्याने 100 प्रवाशांचे प्राण बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजच्या QR 579 या विमानाने दिल्लीहून दोहाला जाण्यासाठी उड्डाण केले होते. या दरम्यान विमानाच्या कार्गो होल्डमधून अचानक धूर येऊ लागला. यानंतर हे विमान पाकिस्तानकडे वळवण्यात आले. कराची विमानतळावर या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. या विमानातून 100 प्रवाशी प्रवास करत होते. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान लँड केल्याने या प्रवाशांचा जीव बचावला. कराची विमानतळावर या विमानाची तपासणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दोहा येथे पाठविण्यात येणार असल्याचे कतार एअरवेजकडून सांगण्यात आले आहे. गैरसोयीबद्दल त्यांनी प्रवाशांप्रति दिलगीरी व्यक्त केली आहे.